गोव्यातील कॅसिनोंवर इडीचे छापे, रात्रभर झाडाझडती
By वासुदेव.पागी | Published: October 31, 2023 03:39 PM2023-10-31T15:39:55+5:302023-10-31T15:46:43+5:30
अंमलबजावणी संचालनालयाकडून गोव्यातील ६ कॅसिनोंवर सोमवारी रात्री उशिरापर्यंत छापे टाकून झाडाझडती घेतली.
पणजी: अंमलबजावणी संचालनालयाकडून गोव्यातील ६ कॅसिनोंवर सोमवारी रात्री उशिरापर्यंत छापे टाकून झाडाझडती घेतली. हे छापे मनी लॉंडरींग प्रकरणात टाकणण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
गुंतवणूकदारांना गंढवून कोट्यवधी रुपये लाटण्याच्या प्रकरणातील तपासादरम्यान यात गोव्यातील काही कॅसिनोंचा सहभाग आढळून आला आहे. मनी लॉंडरिंगद्वारे सुमारे ५० कोटी रुपयांची रक्कम वळविण्यात आल्याचाही तपास यंत्रणांचा दावा आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत अंमलबजावणी विभागाकडून झाडाझडती चालू होती.
अंमलबजावणी विभागाच्या कोची शाखेकडून पणजी आणि जवळपासचच्या भागात कूण ८ ठिकाणी छापे टाकण्यात आले. ८ पैकी ६ छापे हे कँसिनो कार्यालयात टाकण्यात आले अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
दरम्यान गोव्यातील काही कॅसिनो एरव्हीच कोट्यवधी रुपयांच्या जीएसटी थकबाकीमुळे चर्चेत आल्या होत्या. जीएसटी संचालनालयाने डेल्टाकॉर्पसह इतर कॅसिनो कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची थकबाकीची रक्कम फेडण्यासाठी नोटीस बजावली होती. जीएसटी संचालनालयाच्या नोटीसीला कॅसिनो मालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या पार्श्वभुमीवर टाकण्यात आलेल्या या अंमलबजावणी विभागाच्या छाप्यांमुळे लोकांमध्ये कुतूहल वाढले आहे.