अमित पालेकर, रामराव वाघ यांना ईडीने पाठवले समन्स; दत्तप्रसाद, अशोक नाईक यांनाही बोलावणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2024 07:06 AM2024-03-28T07:06:13+5:302024-03-28T07:07:19+5:30
२८ रोजी त्यांना दिल्ली येथे ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मनी लॉन्ड्रिग प्रकरणात सक्त ईडीने गोव्यातील आम आदमी पक्षाच्या दोन नेत्यांसह गोवा मद्य विक्रेते संघटनेचे दत्तप्राद नाईक व भंडारी समाज संघटनेचे अध्यक्ष अशोक नाईक यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. गुरुवार, दि. २८ रोजी त्यांना दिल्ली येथे ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.
समन्स बजावण्यात आलेल्यांमध्ये आम आदमी पक्षाचे गोव्याचे संयोजक अमित पालेकर, आपचे नेते रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक व अशोक नाईक यांचा समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी त्यांना हे समन्स बजावण्यात आले असल्याची माहिती रामराव वाघ यांनी दिली. हे प्रकरण काय आहे आणि आपल्याला का बोलावण्यात आले आहे, याची कल्पनाही आपल्याला नसल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी गेल्या आठवड्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाशी संलग्न हा तपास असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित घोटाळ्यातील पैसा आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वापरल्याचा आरोप ईडीने केला आहे. यासंबंधित चौकशी करण्यासाठीच गोव्यातील आपचे नेते आणि दत्तप्रसाद नाईक यांना बोलावण्यात आल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे.