गोव्यातील शिक्षकांना शाळेत हजर होण्याचे शिक्षण विभागाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 11:29 PM2020-06-23T23:29:23+5:302020-06-23T23:29:44+5:30
कंटेनमेंट झोनमधील शाळा, कंटेनमेंट झोनमध्ये राहणा-या शिक्षकांना तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ताब्यात घेतलेल्या शाळा इमारतींना हा आदेश लागू नाही.
पणजी : शिक्षक तसेच शाळांमधील कारकून, शिपाई, सफाई कामगार आदी शिक्षकेतर कर्मचा-यांना उद्यापासून (दि. २४) शाळेत हजर होण्याचे आदेश शिक्षण खात्याने दिला आहे. कंटेनमेंट झोनमधील शाळा, कंटेनमेंट झोनमध्ये राहणा-या शिक्षकांना तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ताब्यात घेतलेल्या शाळा इमारतींना हा आदेश लागू नाही.
ऑनलाइन किंवा ऑफलाइन धडे घेण्यासाठी अडचण असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत शाळांनी पर्यायी व्यवस्था करावी, विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष शाळा चालू होईपर्यंत ऑनलाइन किंवा ऑफलाइन धडे द्यावेत. शिक्षकांनी वर्षभराचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करावा, शिक्षकांनी प्रत्यक्ष शाळा सुरु होईपर्यंत वर्कशीट, लेक्चर्स इत्यादी तयार करावेत आणि ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेऊ न शकणा-या विद्यार्थ्यांना मदत करावी, असे आदेशात म्हटले आहे.
यांना आहे मुभा!
ज्या शिक्षकांची किंवा शिक्षकेतर कर्मचा-यांची मुले शारिरिक अपंगत्त्व असलेली किंवा मतिमंद असतील तर त्यांना घरी राहून काम करण्यास मुभा आहे. परंतु त्यांनी नेहमीच फोनवर किंवा ऑनलाइन माध्यमातून उपलब्ध असायला हवे. गरोदर महिला कर्मचा-यांना घरी राहून काम करण्याची मुभा देण्यात आली असून त्यांनीही फोनवर किंवा ऑनलाइन माध्यमातून कायम संपर्कात असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष शाळा १५ जुलैनंतरच
विद्यार्थ्यांसाठी राज्यातील विद्यालये १५ जुलैनंतर सुरु होतील, असे जे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे. त्याबद्दल विचारले शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की, जुलैच्या पहिल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शिक्षण ज्याच्या अखत्यारित येते ते केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय एकत्रितपणे पुढील मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करतील आणि त्यानुसारच शाळा, विद्यालये प्रत्यक्ष कधी सुरु होतील हे अवलंबून आहे.