कोल्हापूर, सांगली भागातील पुराचे परिणाम गोव्यातील मूर्ती विक्रेत्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 08:48 PM2019-08-12T20:48:40+5:302019-08-12T20:49:09+5:30
कोल्हापूर, सांगली भागातील मूर्तीकारांनी साडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती दर वर्षी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणल्या जातात.
म्हापसा : महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागात आलेल्या पुराचा तडाखा तसेच सतत पडणा-या पावसामुळे उत्तर गोव्यातील गणेश मूर्ती विक्रेत्यांना बसला आहे. या भागातून मूर्ती आयात करण्यासाठी आगावू नोंदणी करून सुद्धा पूरामुळे बनवण्यात आलेल्या मूर्ती खराब झाल्याने काही मूर्तीकारांनी सिंधुदुर्गातून मूर्ती विक्रीस आणल्या आहेत. झालेल्या परिणामाची झळ गोव्यावर होण्याची संभावना असून मूर्तीचा तुडवटा निर्माण होण्याची किंवा विलंबाने मूर्ती उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोल्हापूर, सांगली भागातील मूर्तीकारांनी साडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती दर वर्षी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणल्या जातात. चतुर्थी पूर्वी किमान महिना तरी या मूर्ती गोव्यात दाखल होत असतात. या मूर्तींची संख्या हजारोंनी असते; पण कोल्हापूर, सांगली भागात गेल्या आठवड्यात आलेल्या पूरामुळे गोव्यातील विक्रेत्यांना मूर्ती आणणे शक्य झाले नाही. काही विक्रेत्यांनी फक्त एक ते दोन ट्रक मूर्ती आणण्यानंतर इतर मूर्ती पूरामुळे आणू शकले नाही. ज्या मूर्तीकारांना मूर्ती मिळू शकल्या नाही त्यांना मुर्तीसाठी कोकणातील मूर्तीकारांचा आसरा घ्यावा लागला. त्यामुळे मूर्तीच्या विक्रीसाठी सजलेल्या गणेश चित्रशाळा अद्यापर्यंत मूर्तीने रंगू शकल्या नाहीत.
म्हापशातील खोर्ली-सीम येथील विक्रेता प्रवीण पार्सेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी आपण कोल्हापूरातून मूर्ती विक्रीसाठी आणत असतो पण यंदा आपण सिंधुदुर्गातील कुडाळ भागातून मूर्ती विक्रीस आणल्या आहेत. विक्रीसाठी आणलेल्या मूर्ती आठ दिवसापूर्वी आणल्या असून ग्राहकांनी त्याची आगावू नोंदणी सुद्धा करून ठेवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात पुन्हा आणखीन मूर्ती विक्रीसाठी आणल्या जातील. सुदेश बर्वे या विक्रेत्यांने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरातून अद्याप एक ट्रक मूर्ती विक्रीसाठी आणणे शक्य झाले. त्यानंतर सतत पाऊस पडल्याने तसेच पूरही आल्याने त्याची झळे सहन करावी लागली. बनवण्यात आलेल्या लहान आकाराच्या मूर्ती सुरक्षीत असल्या तरी मोठ्या आकाराच्या व ग्राहकांच्या जस्त पसंतीच्या मूर्ती खराब झाल्याने परिणाम झाले आहे.
गोव्यातील बहुतांश विक्रेते ग्राहकांकडून मूर्तींची आगावू नोंदणी करून घेतात. त्यांच्या पसंदीनुसार त्यांच्या मागणीनुसार विविध आकाराच्या मूर्ती बनवून त्यांना पुरवल्या जातात. यावर्षी ग्राहकांनी दगडूशेट, पाटील, गजकर्णी, तिरूपती बालाजी, तिरका कोन, मोराच्या प्रभावळीचा तसेच इतर विविध नव्या मॉडलच्या मूर्तीची नोंदणी केली होती. केलेल्या मागणीनुसार अद्यापपर्यंत मूर्तींचा पुरवठा होवू न शकल्याने मूर्तींचा तुटवडा किंवा उशीराने मूर्ती गणेश भक्तांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूर्तीमागे जास्त किंमत मोजावी लागणार आहे.