जलस्रोत संवर्धनाचे प्रयत्न: मंत्री सुभाष शिरोडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:45 IST2025-04-14T15:45:21+5:302025-04-14T15:45:57+5:30
बोरी नवदुर्गा संस्थानच्या तळीची केली पाहणी.

जलस्रोत संवर्धनाचे प्रयत्न: मंत्री सुभाष शिरोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : बोरी पंचायत क्षेत्रातील प्रसिद्ध नैसर्गिक तळीच्या विकास व संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मतदारसंघातील प्रत्येक नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धनासाठी आपले खाते सक्षमपणे प्रकल्प राबवित आहे. बोरी येथील नवदुर्गा देवीच्या तळीचे काम ३० मेपर्यंत पूर्णत्वास येईल, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.
देऊळवाडा-बोरी येथील श्री नवदुर्गा संस्थानच्या तळीच्या कामाची पाहाणी करताना ते बोलत होते. बोरी गावातील विकासकामांबरोबरच बेतोडा, निरंकाल, पंचवाडी, शिरोडा येथील विविध छोटे मोठे पाटबांधाऱ्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मंत्री शिरोडकर यांनी सांगितले की, गोव्यातील असंख्य तळ्याचा नैसर्गिकस्रोत जपताना, त्या तळ्यांचे कायमस्वरुपी संवर्धन करून संपूर्ण परिसराचा कायापालट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्थानिकांचे सहकार्य आवश्यक आहे.
यावेळी मंत्री शिरोडकर म्हणाले की, स्थानिक पंचायतीनी सुद्धा कामांचा पाठपुरावा सुध्दा आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेले जल ही जीवन धोरण अंमलात आणून, सदर प्रकल्प हे आपले स्वप्न असल्याचे शिरोडकर म्हणाले. यावेळी सरपंच जयेश नाईक, माजी सरपंच सुनील सावकार, माजी पंच कमलाकांत गावडे, अभियंता सचिन शिरोडकर, शैलेश नाईक, संदेश पैगिटकर उपस्थित होते.