'म्हादई'तील आग रोखण्याचे प्रयत्न; जैवसंपदेचे प्रचंड नुकसान, वन खात्याचे युद्धपातळीवर मदतकार्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 01:13 PM2023-03-09T13:13:29+5:302023-03-09T13:14:41+5:30
म्हादई क्षेत्रात साट्रे गड या ठिकाणी लागलेली आग आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : म्हादई क्षेत्रात साट्रे गड या ठिकाणी लागलेली आग आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आली आहे. परंतु, गावातून पारवडकडे जाणाऱ्या मार्गावर सुर्ला नदी परिसरातील जंगलातील आगीचा भडका सुरूच आहे. तसेच देरोडे गावातील अभयारण्यात आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
बुधवारी दिवसभर वन खात्याचे कर्मचारी गटागटाने जाऊन आग आटोक्यात आणण्याच्या कामात व्यस्त होते. दरोडे येथील आग आटोक्यात आणण्यासाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांना रसद पुरविण्याचे काम कोदाळ येथील अभयारण्याच्या कार्यालयामधून होत आहे. कर्मचाऱ्यांना अन्न, पाणी पुरविले जाते. वन खात्याचे कर्मचारी आगीशी झुंज देत आहेत. पण, ते पुरेसे ठरलेले नाही. आग रोखण्याच्या कामात बरेच अडथळे येत आहेत. आग दुसरीकडे पसरू नये यासाठी बचावात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे.
तर कोदाळ परिसराला धोका
साट्रे गावातून सुर्ला नदीच्या पलीकडे ज्या ठिकाणी गेल्या वर्षी कडा कोसळला होता, त्या ठिकाणी असलेल्या अभयारण्यात आगीचे लोट दिसत आहेत. आगीचे लोट जर कोदाळ गावच्या दिशेने आले तर वन खात्याच्या रबर लागवडीपर्यंतसुद्धा ती आग येऊ शकते. त्यामुळे आता डोंगरावर लागलेली आग खाली येऊन आणखी पसरणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. पूर्वी पेट्रोल ऑपरेटेड एअर ब्लोअर वापरून पालापाचोळा दूर करण्याचे तंत्र वापरले जात होते. आताही तसेच करण्याची, आग दुसरीकडे पसरणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. दाट अरण्यात पोहोचून आग रोखणे आवाक्याबाहेरचे आहे. त्यामुळे आग अजून दुसरीकडे पसरू नये यासाठी काळजी घेणे किंवा त्यासाठीची उपाययोजना हेच वन खात्याच्या पर्यायाने सरकारच्या हातात आहे. सरकारने त्वरित उपाययोजना करावी आणि आग पसरू नये याची काळजी घ्यावी, अशी पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"