दाबोळीवर येणारी 8 विमाने खराब हवामानामुळे दुसऱ्या विमानतळावर वळवली, मुंबईहून येणाऱ्या 2 विमानांचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 04:04 PM2023-02-22T16:04:12+5:302023-02-22T16:09:19+5:30
मस्कत, मुंबई, बंगलोर, दिल्ली, हैद्राबाद आणि कोचीनहून गोव्यात येणारी विमानं वळवली...
वास्को : गोव्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास धुके पसरून खराब हवामान निर्माण झाले होत. यामुळे दाबोळी विमानतळ परिसरातही कमी दृश्यमान स्थिती निर्माण झाल्याने सकाळी दाबोळी विमानतळावर प्रवाशांना घेऊन उतरणार असलेली आठ विमाने देशातील दुसऱ्या विमानतळावर वळवण्यात आली.
खराब हवामानामुळे कमी दृश्यमान निर्माण झाल्याने मस्कतहून दाबोळीवर प्रवाशांना घेऊन उतरणार असलेल्या एका अंतरराष्ट्रीय विमानासहीत मुंबई आणि बंगलोरहून येणाऱ्या प्रत्येकी २ तर दिल्ली, हैद्राबाद आणि कोचीनहून येणाऱ्या प्रत्येकी एक विमानांना वळवून दुसऱ्या विमानतळावर उतरविले. काही तासानंतर दाबोळी विमानतळाच्या परिसरातील हवामान ठीक झाल्यानंतर दाबोळी ऐवजी देशाच्या दुसऱ्या विमानतळावर उतरलेल्या त्या विमानांनी तेथून उड्डाण घेऊन नंतर ती विमाने दाबोळीवर उतरली.
बुधवारी पहाटे दाबोळी विमानतळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात धुके पसरल्याने येथे कमी दृश्यमान स्थिती निर्माण झाली. त्यावेळेत दाबोळीवर एका अंतरराष्ट्रीय विमानासहीत देशाच्या विविध भागातील अन्य सात विमाने प्रवाशांना घेऊन उतरणार होती. कमी दृश्यमान निर्माण झाल्याने त्यावेळेत दाबोळीवर विमान उतरविणे शक्य नसल्याने येथे येण्यासाठी उड्डाणात असलेली ती विमाने देशाच्या दुसऱ्या विमानतळावर वळवून तेथे उतरविली. त्यात मस्कतहून दाबोळी विमानतळावर येत असलेले ‘ओमान एअर’ चे विमान वळवून मुंबई विमानतळावर उतरविण्यात आले.
मुंबईहून गोव्यात येत असलेली ‘गो फस्ट’ आणि ‘एअर इंडीया’ ची विमाने वळवून पुन्हा मुंबई विमानतळावर उतरविली. बंगलोरहून गोव्यात येत असलेले ‘इंडीगो’ चे विमान मुंबई विमानतळावर तर ‘एअर एशिया’ चे विमान हैद्राबाद विमानतळावर वळवण्यात आले. दिल्लीहून येत असलेले ‘एअर एशिया’ चे विमान बंगलोर, हैद्राबादहून येणारे ‘इंडीगो’ चे विमान हैद्राबाद तर कोचिनहून येणारे ‘इंडीगो’ चे विमान मुंबई विमानतळावर उतरविल्याची माहीती दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिली.
सुमारे दोन तासानंतर दाबोळीच्या परिसरातील हवामान ठीक होऊन प्रवाशांना घेऊन येणारी विमाने सुरक्षितरित्या दाबोळीवर उतरू शकत असल्याची खात्री झाली. त्यानंतर दाबोळी ऐवजी दुसऱ्या विमानतळावर उतरलेल्या त्या विमानांनी तेथून उड्डाण घेऊन ती विमाने दाबोळी विमानतळावर उतरली. दुसऱ्या विमानतळावर वळवलेली आठही विमाने नंतर ११.१५ पर्यंत दाबोळीवर येऊन उतरली असून खराब हवामानामुळे त्या विमानांना दाबोळीवर पोचण्यासाठी सुमारे दोन ते अडीच तासाचा उशिर झाला.