बापरे! वास्कोत आठ महिन्यांत ९०९ लोकांचा कुत्र्यांनी घेतला चावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 05:22 PM2020-09-28T17:22:34+5:302020-09-28T17:22:48+5:30

फेब्रुवारी महिन्यात १५३, जून महिन्यात ८२, जुलै महिन्यात ६८ तर ऑगस्ट महिन्यात ९८ नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटना घडल्याची माहिती प्राप्त झाली.

In eight months, 909 people were bitten by dogs in Vasco | बापरे! वास्कोत आठ महिन्यांत ९०९ लोकांचा कुत्र्यांनी घेतला चावा

बापरे! वास्कोत आठ महिन्यांत ९०९ लोकांचा कुत्र्यांनी घेतला चावा

Next

वास्को: जानेवारी ते ऑगस्ट अशा आठ महिन्यांत दक्षिण गोव्यातील वास्को शहर व जवळपासच्या भागात राहणा-या ९०९ नागरिकांना भटक्या व इतर कुत्र्यांनी चावा घेतल्याचे उघड झाले असून, भटक्या कुत्र्यांचा चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने ही चिंतेची गोष्ट आहे. लॉकडाऊन लागू असलेल्या काळातसुद्धा भटक्या कुत्र्यांनी वास्को व परिसरातील नागरिकांना ब-याच प्रमाणात चावा घेतला असून, येथे एप्रिल महिन्यात ११३ तर मे महिन्यात ११९ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती चिखली उपजिल्हा इस्पितळाकडून प्राप्त झाली.

मागच्या काही वर्षात वास्को व परिसरातील भागात भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांचा चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ होत चालल्याचे दिसून येत आहे. मागच्या वर्षी (२०१९ मध्ये) वास्को व परिसरात राहणा-या १ हजार ४४४ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती चिखली उपजिल्हा इस्पितळातून प्राप्त झाली असून, यापैंकी जास्तीत जास्त चावा भटक्या कुत्र्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०२० सालातील काही महिने वगळले तर इतर महिन्यात मागच्या वर्षांपेक्षा यावर्षी लोकांना कुत्र्यांनी चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन केल्यानंतर राज्यातील इतर भागाबरोबरच वास्को व परिसरातील नागरिकांनीसुद्धा या लॉकडाऊनमध्ये भाग घेतला होता. असे असतानासुद्धा लॉकडाऊन काळात कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आकडा काही प्रमाणात मोठाच असल्याची माहीती सूत्रांनी दिली असून चावा घेणा-या या कुत्र्यात जास्तीत जास्त भटक्या कुत्र्यांचा समावेश आहे.

२२ मार्चपासून लॉकडाऊन लागू केला असून, या संपूर्ण महिन्यात वास्को व परिसरातील भागात राहणा-या ११६ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती उपलब्ध झाली. लॉकडाऊन काळातील एप्रिल महिन्यात वास्को व परिसरातील भागात राहणा-या ११३ जणांचा कुत्र्यांनी चावा घेतला असून, मे महिन्यात ११९ जणांना चावा घेतल्याची माहिती उपलब्ध झाली. लॉकडाऊन काळातही वास्को व परिसरातील भटक्या कुत्र्यांचे लोकांना चावण्याचे प्रमाण मोठे असल्याचे या आकड्यावरून दिसून येते. २०२० च्या जानेवारी ते ऑगस्ट अशा आठ महिन्यांत वास्को व परिसरात राहणा-या ९०९ नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला असून, या वर्षाच्या जानेवारी महिन्यात याबाबत सर्वात जास्त अशा १६० घटना घडल्याची माहिती चिखली उपजिल्हा इस्पितळातून मिळाली. फेब्रुवारी महिन्यात १५३, जून महिन्यात ८२, जुलै महिन्यात ६८ तर ऑगस्ट महिन्यात ९८ नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटना घडल्याची माहिती प्राप्त झाली.

मागच्या काही वर्षात भटक्या कुत्र्यांचे चावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण होत असून, लोकांच्या हितासाठी मुरगाव नगरपालिकेने तसेच संबंधित विभागाने उचित पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वास्को व परिसरातील भागात कुत्र्यांचे चावण्याच्या प्रमाणाबरोबरच भटक्या कुत्र्यांच्या संख्येतसुद्धा काही वर्षात बरीच वाढ झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून, यामुळे येथे राहणा-या नागरिकांना विविध प्रकारचा त्रास सोसावा लागत आहे. जनतेच्या हितासाठी मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत वाढणारी भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी काय पावले उचलण्यात येतात, याबाबत माहिती घेण्यासाठी मुरगावच्या उपनगराध्यक्षा रिमा सोनुर्लेकर यांना संपर्क केला असता पालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम ‘पिपल फोर अ‍ॅनिमल’ या संस्थेला देण्यात आलेले असल्याची माहिती त्यांनी दिली. जरी मुरगाव नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरणाचे काम एका संस्थेला दिलेले आहे, तरी ते ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या प्रमाणात वाढ होत असून, वाढणा-या भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी आणखीन जास्त पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 

पहाटे कामावर जाताना
वास्को रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक रामदास गुड्डेमणी जानेवारी महिन्याच्या अखेरीस पहाटे चालत कामावर जात असताना त्यांचा भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. याबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता आपण नवेवाडे भागातून पहाटे चालत कामावर जात असताना एका भटक्या कुत्र्याने आपला चावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. कामावरचा आपला सफेद गणवेश घालून जाताना त्या भटक्या कुत्र्याने आपल्याला पाहिल्यानंतर त्याने पळत येऊन माझा चावा घेतला होता, अशी माहिती रामदास गुड्डेमणी यांनी दिली. या भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काहीतरी उचित पावले उचलणे गरजेचे असल्याचे ते शेवटी म्हणाले. 

कुत्र्यांची झुंड

सडा भागात असलेल्या कचरा प्रकल्पाजवळ भटक्या कुत्र्यांची मोठी झुंड असून, रात्रीच्या वेळी या भागातून प्रवास करणे म्हणजे एकदम धोकादायक आहे. काही वर्षांपूर्वी या भागात राहणा-या छोट्या मुलावरसुद्धा या भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना बरेच जखमी केले होते. तसेच सदर परिसरातून दुचाकी घेऊन जातानासुद्धा येथे असलेले भटके कुत्रे त्या दुचाकींच्या मागे लागत असून, यामुळे दुचाकी चालवणा-याला बराच धोका निर्माण होतो. या भागात तयार झालेला भटक्या कुत्र्यांचा धोका दूर करण्यासाठी मुरगाव नगरपालिकेने काही तरी उचित पावले उचलणे गरजेचे असल्याची मागणी येथे राहणा-या नागरिकांकडून होत आहे.

Web Title: In eight months, 909 people were bitten by dogs in Vasco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा