Eknath Shinde: नवे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे रवाना, राज्यपालांची भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:45 PM2022-06-30T12:45:20+5:302022-06-30T12:48:25+5:30
Eknath Shinde News: शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे निघाले असून आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांचे सहकारी बंडखोर आमदार गोव्यातच असून ते एकटेच मुंबईकडे निघाले आहेत.
पणजी - शिवसेना बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे निघाले असून आपण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिंदे यांचे सहकारी बंडखोर आमदार गोव्यातच असून ते एकटेच मुंबईकडे निघाले आहेत.
दोनापॉल येथील ताज कन्वेंशन या पंचतारांकित हॉटेलमध्ये काल रात्रीपासून शिवसेना शिंदे हे बंडखोर आमदारांसह तळ ठोकून होते. दुपारी १२.१५ च्या सुमारास केवळ शिंदे हॉटेलमधून विमानतळाकडे जाण्यासाठी बाहेर पडले. पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की‘ मी मुंबईला राज्यपालांची भेट घेण्यासाठी जात आहे. माझे सहकारी आमदार तूर्त गोव्यातच राहतील.’
दरम्यान, शिंदे यांची गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी भेट घेतली. सकाळी तानावडे तासभर या ठिकाणी होते. त्यांनी भेट घेतल्यानंतर घेतल्यानंतर या प्रतिनिधीने संपर्क साधला असता तानावडे म्हणाले की, ‘ ही केवळ सौजन्य भेट होती. बंडखोर आमदार आमच्या राज्यात आहेत त्यामुळे त्यांची केवळ विचारपूस केली. इतर कोणतीच चर्चा झालेली नाही.’
दरम्यान, काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास हॉटेलमध्ये आलेले बंडखोर सेना आमदार कडेकोट पोलिस बंदोबस्तात आहेत. कोणीही आमदार बाहेर आलेला नाही किंवा कोणाही व्यक्तीला हॉटेलमध्यही प्रवेश दिला जात नाही. दोनापॉल येथे हॉटेलपासून एक दीड किलोमिटरवर प्रत्येक वाहनांची झाडाझडती चालू आहे. शेजारी सिंंधुदुर्गातून शिवसैनिकांनी येथे येऊन गोंधळ घातला जाऊ नये, यासाठी कालपासूनच पत्रादेवी, दोडामार्ग, सातार्डा, आरोंदा चेकनाक्यांवर वाहनांची कडेकोट तपासणी सुरु आहे.