बसच्या धडकेत वयोवृद्ध इसमाचा मृत्यू, बसचालक अटकेत
By सूरज.नाईकपवार | Updated: April 17, 2024 15:23 IST2024-04-17T15:23:15+5:302024-04-17T15:23:30+5:30
भावाला उपचारासाठी केले दाखल इस्पितळात, परत जात असताना बसच्या धडकेने मृत्यू

बसच्या धडकेत वयोवृद्ध इसमाचा मृत्यू, बसचालक अटकेत
मडगाव: बसच्या धडकेने एका साठ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. गोव्यातील सासष्टीतील बाळ्ळी येथे आज बुधवारी सकाळी ही घटना घडली. एकनाथ नाईक असे मयताचे नाव असून, ते बेतुल येथील रहिवाशी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मयताने आपल्या भावाला उपचारासाठी बाळ्ळीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले होते. यानंतर आपल्या घरी परत जात असताना सीबर्ड या बसने त्यांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. नंतर त्यांना बाळ्ळीच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. सकाळी सातच्या दरम्यान ही अपघातची घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आपल्या दुचाकीवरुन कुंकळ्ळीच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्याला बसने धडक दिली. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. बसचालक दुर्गप्पा कोरागोंडा (३७) याच्याविरोधात गुन्हा नोंद करुन त्याला अटक केली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत.