निवडणूक आयोगाची पर्रिकरांना पुन्हा नोटीस

By admin | Published: February 8, 2017 05:11 AM2017-02-08T05:11:16+5:302017-02-08T05:11:16+5:30

सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल भागात भाजपचा प्रचार करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मतदारांना उद्देशून पैसे स्वीकारण्याचे विधान केले होते.

Election Commission re-notice to Parrikar | निवडणूक आयोगाची पर्रिकरांना पुन्हा नोटीस

निवडणूक आयोगाची पर्रिकरांना पुन्हा नोटीस

Next

पणजी (गोवा) : सांताक्रुझ मतदारसंघातील चिंबल भागात भाजपचा प्रचार करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मतदारांना उद्देशून पैसे स्वीकारण्याचे विधान केले होते. त्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पर्रिकर यांना पुन्हा नोटीस बजावली आहे. येत्या शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत पर्रिकर यांनी नोटीशीला अंतिम उत्तर देणे अपेक्षित असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
‘आम्ही (म्हणजे सरकार) तुम्हाला दरमहा दोन हजार ते तीन हजार रुपये देत असतो. दुसरे कुणी तुम्हाला रॅलीला येण्यासाठी किंवा प्रचारावेळी फिरण्यासाठी पैसे देत असतील, तर आमचा आक्षेप नाही; पण मत मात्र कमळाला मारा,’ असे विधान पर्रिकर यांनी केल्याचे आयोगाचे म्हणणे आहे. हे विधान लाचखोरीस प्रोत्साहन देणारे आहे, असे आयोगाने १ फेब्रुवारी रोजी पाठविलेल्या पहिल्या नोटिशीत म्हटले होते.
पहिल्या नोटिशीला उत्तर देताना पर्रिकर यांनी नोटीस पाठविण्याच्या आयोगाच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तसेच आपण केलेल्या विधानाचा अनुवाद आयोगाने व्यवस्थित केलेला नाही, असा दावा केला होता. आयोगाला मिळालेल्या सीडीबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला होता. मात्र आयोगाचे या उत्तराने समाधान झाले नाही. ती सीडी योग्य असल्याची व अनुवादही योग्य प्रकारे झाला असल्याची खात्री आयोगाने करून घेतली असल्याचे आयोगाने मंगळवारी पाठविलेल्या नव्या नोटिशीत म्हटले आहे. पर्रीकर यांचे भाषण आयोगाच्या तीन सदस्यीय समितीने अनुवादित करून त्याची खात्री करून घेतली. तसेच येत्या शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आपण नोटिशीला अंतिम उत्तर सादर करू शकता, असे आयोगाचे सचिव सुमित मुखर्जी यांनी म्हटले आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: Election Commission re-notice to Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.