उमेदवारीचा दिल्लीत खल; भाजपच्या उमेदवार घोषणेची काँग्रेसला प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2024 08:15 AM2024-03-18T08:15:37+5:302024-03-18T08:16:11+5:30
पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष, उत्कंठा शिगेला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजपकडून दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार आज, सोमवारी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसने आधी भाजपने दक्षिणेत तिकीट जाहीर करू दे, नंतर आपले दोन्ही उमेदवार जाहीर करू, अशी भूमिका घेतली आहे. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, कोणाला उमेदवारी देतात याकडे दोन्ही प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
गोव्यात ७ मे रोजी लोकसभा निवडणूक होणार असून प्रचारासाठी उमेदवारांना ५१ दिवस मिळतात. उमेदवार जाहीर करण्यास जेवढा विलंब लावला जाईल, तेवढे प्रचारासाठी दिवस कमी मिळतील. त्यामुळे लवकर उमेदवार देण्याची कार्यकर्त्यांची मागणी आहे.
दक्षिण गोव्यात भाजप खरोखरच महिला उमेदवार देतो की या निर्णयात बदल करून अन्य कोणाला तिकीट देतो, यावर काँग्रेसचा उमेदवार ठरणार आहे. भाजपकडून दक्षिणेत उच्च शिक्षित महिला म्हणून धंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांच्या पत्नी पल्लवी यांचे नाव चर्चेत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे काल रविवारी दिल्लीला जाणार होते. परंतु, काल ते गेले नाहीत. कदाचित आज सोमवारी त्यांना दिल्लीला बोलावून घेऊन दक्षिणेच्या तिकिटाचा सोक्षमोक्ष लावला जाण्याची शक्यता आहे.
भरारी पथके स्थापन
लोकसभा निवडणुकीसाठी भरारी पथके, क्षेत्रीय अधिकारी व टेहळणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. गृह खात्याने या पथकांमधील अधिकाऱ्यांचे मोबाइल संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत. भरारी पथकांमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तीन याप्रमाणे उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येकी ६० अधिकारी भरारी पथकांमध्ये आहेत. निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी ही भरारी पथके गस्त घालणार आहेत. उत्तर गोव्यात नऊ निरीक्षक नेमले आहेत. ही पथके निवडणुकीतील गैर प्रकारांवर लक्ष ठेवून असतील.
दक्षिण गोव्यात पाटकर यांच्या नावाचीही चर्चा
काँग्रेसने दक्षिण गोव्यातून विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व कॅप्टन विरियातो फर्नांडिस अशी तीन नावे पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवली. परंतु, भाजप महिला उमेदवार देणार, हे निश्चित असल्याने काँग्रेसमध्येही हालचाली गतिमान झाल्या. इंडिया आघाडीच्या वतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्या नावाची चर्चा दक्षिण गोव्यात सुरू झाली आहे. अंतिम निर्णय दिल्लीतच होईल. पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्ता पक्षश्रेष्ठींच्या भेटीस दिल्लीला गेले आहेत.
संभ्रम वाढला
दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपकडून सुरुवातीला तीन नावांची चर्चा झाली. त्यापाठोपाठ महिला उमेदवार देण्याविषयी चर्चा सुरू झाल्यावर पाच नावांची चर्चा झाली. ही नावे मागे पडून मध्यंतरी आणखी काही नावेही इच्छुक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नेमकी उमेदवारी कोणाला याविषयी कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
मी कुठल्या बाजूने हे सर्वांनाच ठाऊक
दरम्यान, प्रसार माध्यमांनी उत्पल पर्रीकर यांना येत्या निवडणुकीत त्यांची काय भूमिका असेल, असे विचारले असता ते म्हणाले की, 'सर्वांनाच माहीत आहे की मी कुठल्या बाजूने आहे. २०१४ पासून आम्ही मोदीजीसोबत आहोत. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत पणजीवासीयांच्या हितासाठी वेगळा मार्ग पत्करावा लागला. तांत्रिकदृष्ट्या मी भाजपमध्ये नसलो तरी लोकसभा निवडणुकीत माझा कल कुठल्या बाजूने आहे, हे सर्वज्ञात आहे.'