राज्यात ८,९६,९५८ जणांनी केले मतदान: निवडणूक अधिकारी; टपाल मतांची आकडेवारी चार दिवसांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2024 10:15 AM2024-05-09T10:15:08+5:302024-05-09T10:16:01+5:30
लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात झालेले मतदान हे देशाच्या तुलनेत विक्रमी नसले तरी गोव्यापुरता विचार केल्यास ते विक्रमी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून देण्यात आलेल्या सुधारित माहितीनुसार टपालमधून आलेली मते वगळून राज्यात यंदा ७६.०६ टक्के झाले आहे. उत्तर गोव्यात ७७.६९ टक्के तर दक्षिण गोव्यात ७४.४७ टक्के मतदान झाले आहे. एकूण ८ लाख ९६ हजार ९५८ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी गोव्यात झालेले मतदान हे देशाच्या तुलनेत विक्रमी नसले तरी गोव्यापुरता विचार केल्यास ते विक्रमी आहे. यापूर्वी लोकसभेसाठी गोव्यात इतके मतदान कधीच झाले नव्हते, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांनी दिली आहे. या आकडेवारीत टपालाद्वारे प्राप्त झालेली मते अद्याप मिळविलेली नाही. कारण अजून टपालद्वारे झालेल्या मतदानाची पूर्ण आकडेवारी आलेली नाही. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ११ हजार ११५ जणांनी टपालद्वारे मतदान केले आहे. आणखी दोन, चार दिवसांत टपालमतांची एकूण संख्या मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदान सुरुवातीच्या दोन तासांत खूपच संथगतीने झाले हे वर्मा यांनी मान्य केले. इव्हीएम सकाळच्या दोन तास संथ होती आणि त्यामुळे मतदानाची गती मंदावली होती. परंतु त्यानंतर मतदान प्रक्रियेने वेग घेतला, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मतदानाच्या दिवशी निवडणूक आचारसंहिता भंग करण्याच्या व इतर मिळून १९ तक्रारी आल्या होत्या. त्या सर्व तक्रारींवर चौकशी करून अहवाल मागितला आहे. आपण केलेल्या मतदानाचा फोटो घेण्याचा प्रकार एका महिलेने केल्याच्या तक्रारीचाही त्यात समावेश आहे. आचारसंहिता उल्लंघनाच्या एकूण १९० तक्रारी आल्या आणि त्यातील १४० तक्रारी निकालात काढण्यात आल्या. ईव्हीएम खराब होण्याचे प्रकार नेमके किती घडले याबाबत अद्याप आयोगाकडे माहिती नाही, परंतु संशयित ३९ इव्हीएम बदलल्याची माहिती त्यांनी दिली.