2020पर्यंत कोकण रेल्वेच्या पूर्ण मार्गाचे विद्युतीकरण, मडगाव रेल्वे स्थानकाचाही विस्तार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 07:38 PM2019-07-05T19:38:39+5:302019-07-05T19:38:59+5:30
येत्या 2020 पर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून डिझेल इंजिनवर धावणा-या सर्व गाड्या बंद होणार असून, या मार्गावरून केवळ विजेवर चालणा-या गाड्याच धावणार आहेत.
मडगाव: येत्या 2020 पर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून डिझेल इंजिनवर धावणा-या सर्व गाड्या बंद होणार असून, या मार्गावरून केवळ विजेवर चालणा-या गाड्याच धावणार आहेत. रोहा ते मंगळुरुपर्यंत 740 किमीच्या मार्गाचे एकूण 1400 कोटी रुपये खर्चून विद्युतीकरण करण्याचे काम सध्या हाती घेतले असून येत्या वर्षअखेर ते पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
विजेवर धावणा-या गाड्यांमुळे डिझेलवरील बराच मोठा खर्च कमी होणार असून, त्याशिवाय पर्यावरणासाठीही या बदलाचा फायदा होईल अशी माहिती कोकण रेल्वेचे सहाय्यक सरव्यवस्थापक (जनसंपर्क) बबन घाटगे यांनी दिली. ते म्हणाले, सध्या दक्षिण भागात मंगळुरुपर्यंत तर पश्चिम भागात रोहापर्यंतच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. राहिलेल्या मार्गाचे विद्युतीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी रोहा ते वेर्णा तसेच वेर्णा ते मंगळुरु अशा दोन वेगवेगळ्या एजन्सीकडून काम केले जात आहे.
कोकण रेल्वेने सध्या विस्तारीकरणाचेही काम हाती घेतले असून, वेर्णा ते रोहा दरम्यानच्या 420 किमी मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम या वर्षाअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. गोव्यातील मुख्य रेल्वे स्थानक असलेल्या मडगाव रेल्वे स्थानकावर पाचवे प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम सध्या सुरू असून त्याशिवाय या स्थानकाला आणखी एका पटरीची जोड देण्यात येणार आहे. या विस्तारानंतर गोव्यातील पर्यटनाला अधिक जोड मिळेल, अशी अपेक्षा घाटगे यांनी व्यक्त केली.
या विस्ताराअंतर्गत कोकण रेल्वे 11 नव्या स्थानकांचा विस्तार करणार असून याशिवाय कोकण रेल्वे मार्गावर आठ लुपलाईन्स सुरु करण्यात येणार आहे. मुर्डेश्वर येथे लुपलाईन सुरू झाली असून इतर ठिकाणी डिसेंबर अखेरपर्यंत त्या सुरू होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.