'एकादश तीर्थ' मोहिमेखाली अकरा मंदिरे; आध्यात्मिक पर्यटनाला नवा आयाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 08:34 AM2024-01-25T08:34:44+5:302024-01-25T08:35:59+5:30
महागणपती मंदिर, सप्तकोटेश्वर मंदिराचा समावेश.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आध्यात्मिक पर्यटनाला नवा आयाम देण्यासाठी 'एकादश तीर्थ' मोहिमेखाली राज्यातील ११ मंदिरे पुढील ३६ महिन्यांच्या कालावधीत विकसित केली जाणार आहेत.
या प्रतिनिधीला मिळालेल्या माहितीनुसार नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर, खांडोळा येथील महागणपती मंदिर, फातर्पा येथील शांतादुर्गा कुंकळ्येकरीण, सत्तरीतील ब्रह्माकरमळी मंदिर आदी मंदिरांचा यात समावेश असेल. सर्व अकरा मंदिरे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभागात असल्याने विकसित होऊ शकलेली नाहीत.
एकादश तीर्थ मोहीम अध्यात्म, स्वदेशी, सभ्यता आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि जागरूक पर्यटन या चार स्तंभांवर आधारित असेल. दरम्यान, आध्यात्मिक पर्यटन उपक्रमांतर्गत सहा शहरांमध्ये शिवजयंती साजरी केली जाईल. त्यासाठी प्रत्येक पालिकेला पाच लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा याआधीच मंत्री खंवटे यांनी केली आहे.
या प्रतिनिधीला मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण व उत्तर गोवा, अशी दोन म्युझियम येतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची यशोगाथा यातून प्रदर्शित केली जाईल. उत्तर गोव्यात मोठा शिवपुतळाही उभारण्याची पर्यटन खात्याची योजना आहेत. राज्यात प्रदूषणमुक्त हरित पर्यटनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
समुदाय-आधारित पर्यटन उपक्रमांमध्ये गुंतवणूक : खंवटे
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आम्ही समुदाय-आधारित पर्यटन उपक्रमांमध्ये गुंतवणूक करणार आहोत. गोव्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना आध्यात्मिक पर्यटनाकडे वळण्याचा एक भाग आहे. पर्यटकांना मंदिरांना भेट देण्यासाठी, गावांमध्ये मुक्काम करण्यासाठी तसेच स्थानिक जीवनशैली समजून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.