कचरा हटवा, निधीचा योग्य वापर करा! मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2024 12:05 PM2024-12-02T12:05:14+5:302024-12-02T12:06:22+5:30

साखळी मतदारसंघातील स्थानिक लोकप्रतिनिधींना कानपिचक्या

eliminate waste use funds wisely said cm pramod sawant | कचरा हटवा, निधीचा योग्य वापर करा! मुख्यमंत्री

कचरा हटवा, निधीचा योग्य वापर करा! मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : पंचायत सदस्य, नगरसेवक हे केवळ गावागावांत गटारे उभारण्यासाठी नाहीत तर त्यांनी 'आउट ऑफ बॉक्स' जाऊन प्रत्येक कुटुंबाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करावेत. गावातील कचरा व्यवस्थापनाबरोबर पंचायतीसाठी मंजूर झालेल्या निधीचा योग्य वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी मतदारसंघातील सातही ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका मंडळ, सर्व सचिव व अधिकाऱ्यांची रविवारी संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. यावेळी तपशीलवार आढावा ढावा घेताना त्यांनी संबंधितांना सूचनाही केल्या. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विशांत चिमूरकर आदी उपस्थित होते. आजपर्यंतचा अनुभव हा स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ वेगवेगळ्या ठिकाणी गटारे बांधून निधीचा अपव्यय करतात, असे निदर्शनास आलेले आहे. गावाच्या विकासाचा निश्चित आराखडा तयार करून गावासाठी काय करणे उपयुक्त आहे, याबाबत स्थानिक प्रतिनिधींनी ग्रामस्थांशी चर्चा करून प्रकल्प राबवले तर तो निधी खऱ्या अर्थाने कल्याणकारी ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपल्या भागातील प्रत्येक घराबाबत चांगल्या-वाईट गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. लोक केवळ विविध प्रकल्प उभारले म्हणून मते देणार नाहीत तर त्यांची गरज ओळखून कामे करा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

कचरा व्यवस्थापन करताना प्रत्येक पंचायत सदस्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. पंचायतीत कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य अशा चौफेर घटकांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी योगदान देणे महत्त्वाचे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी हे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत, त्यामुळे तशा भावनेनेच त्यांनी काम करावे. निवडणुकी पुरतेच मर्यादित न राहता त्यानंतर आपण जनतेला कशाप्रकारे वेगवेगळ्ळ्या योजनांचा फायदा मिळवून देऊ शकतो यावर भर द्या.

पंचायती उदासीन 

आपल्या पंचायत क्षेत्रातील प्रत्येक घरात आपण कशाप्रकारे लोकांपर्यंत वेगवेगळ्या योजना राबवू शकतो, यावर विशेष भर देणे गरजेचे आहे. मात्र, अनेक पंचायती याबाबत उदासीन दिसून येत असल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पंचायतींना इशारा

आज अनेक पंचायतींचा वेगवेगळ्ळ्या पातळीवरचा निधी तसाच पडून आहे. अनेक ठिकाणी पंचायत मंडळाकडे दूरदृष्टीचा अभाव व काम करण्याची प्रवृत्ती नसल्याने अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, यापुढे अशा प्रकारच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. निधीचा योग्य वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
 

Web Title: eliminate waste use funds wisely said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.