एल्वीस गोम्स लढणार ‘आप’तर्फे कुंकळ्ळीतून
By Admin | Published: September 28, 2016 01:55 AM2016-09-28T01:55:44+5:302016-09-28T01:58:04+5:30
कुंकळ्ळी : राजकारणात येण्यासाठी सरकारी नोकरीचा राजीनामा देणारे एल्वीस गोम्स आपल्या जन्मगावातून म्हणजेच कुंकळ्ळी
कुंकळ्ळी : राजकारणात येण्यासाठी सरकारी नोकरीचा राजीनामा देणारे एल्वीस गोम्स आपल्या जन्मगावातून म्हणजेच कुंकळ्ळी मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवारीवर निवडणुकीत उतरणार आहेत.
गोम्स यांना ‘आप’चा चेहरा म्हणून गोव्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरविण्यात येणार आहे. ‘आप’च्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोम्स ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. डॉ. आॅस्कर रिबेलो यांनी व्यक्तिगत व व्यावसायिक कारणास्तव निवडणुकीत प्रत्यक्ष उतरण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे गोम्स यांना मुख्यामंत्रिपदाचे उमेदवार घोषित करण्याचे ‘आप’ने ठरविले आहे.
एल्वीस गोम्स हे कुंकळ्ळीचे सुपुत्र असून कुंकळ्ळी युनियन या क्रीडा संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. गोम्स निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे कुंकळ्ळी मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने रंग चढला आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात सध्या भाजपचे राजन नाईक हे आमदार असून काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर क्लेफासियो डायस, देवेंद्र देसाई, जॉन मोन्तेरो व ज्योकिम आलेमाव यांनी दावा केला आहे. गोम्स यांचा स्वत:चा चाहता वर्ग असून ‘आप’नेही या मतदारसंघात बऱ्यापैकी बस्तान बसविले आहे. कुंकळ्ळी पालिका क्षेत्रात गोम्स यांना मतदारांचा पाठिंबा लाभण्याची शक्यता आहे. गोम्स यांना तरुणांचा पाठिंबा लाभत असून पारोडा, आंबावली, गिरदोली, चांदर, माकाझन व बाळ्ळी पंचायत क्षेत्रातील मतदारांना आकर्षित करण्यात यशस्वी झाल्यास ‘आप’ या मतदारसंघात करामत करण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोम्स यांच्या येण्याने आलेमाव व डायस यांचे धाबे दणाणले आहेत. गोम्स समर्थकांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, ते गांधी जयंतीपासून म्हणजेच २ आॅक्टोबरपासून प्रचार कार्यास सुरुवात करणार आहेत. ‘आप’ने कुंकळ्ळी मतदारसंघात
प्रचार कार्यालय थाटले असून
अनेक कार्यकर्त्यांची फौज ‘आप’मधे सहभागी झाली आहे.
तीन महिन्यांपूर्वी गोम्स यांनी नोकरीचा राजीनामा दिला होता. गृहनिर्माण भूखंड घोटाळ्यात
हात असल्याच्या संशयावरून भ्रष्टाचारविरोधी पथकाने त्यांच्यावर गुन्हा नोंदविला होता. (प्रतिनिधी)