सायबरसुरक्षा कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील दिव्यांगाच्या सक्षमीकरणावर भर
By समीर नाईक | Published: July 8, 2024 03:38 PM2024-07-08T15:38:36+5:302024-07-08T15:39:05+5:30
मुंबई उच्च न्यायालय-गोवा खंडपीठ संकुलातील गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीतील लोक अदालत सभागृहामध्ये ही कार्यशाळा पार पडली.
पणजी : राज्य विधी सेवा प्राधिकरणाने राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाच्या सहकार्याने नुकतीच सायबरसुरक्षा जागरूकता कार्यशाळा पार पडली. मुंबई उच्च न्यायालय-गोवा खंडपीठ संकुलातील गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या इमारतीतील लोक अदालत सभागृहामध्ये ही कार्यशाळा पार पडली.
खास दिव्यांग व्यक्तींसाठी आयोजित या अर्धदिवसीय कार्यशाळेमध्ये ॲड. ईशान उसपकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस राज्यातील विविध शासकीय खाती, विभागांच्या कार्यालयांमधील कार्यरत ५५ हून अधिक दिव्यांग शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. मुंबई उच्च न्यायालय-गोवा खंडपीठाचे वरिष्ठ अधिकारी आणि न्यायाधीश यांनीही कार्यशाळेत सहभागी होत या कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले.
आर्थिक फसवणूक होण्याचा आणि सायबर गुन्ह्यांचा धोका असतो अशा लोकांसाठी, विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी सायबरसुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सायबरसुरक्षेच्या अत्यावश्यक बाबींचा प्रचार करून, डिजिटल जगामध्ये सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक आणि आर्थिक कल्याणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाला सक्षम करण्याचे आमचे ध्येय आहे. असे राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी यावेळी सांगितले.
विविध जागरूकता उपक्रमांद्वारे दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करण्याच्या प्रयत्नांमध्ये राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय आणि गोवा राज्य विधी सेवा प्राधिकरण आघाडीवर आहेत. सर्वांसाठी अधिक सुरक्षित आणि अधिक सर्वसमावेशक असे वातावरण उपलब्ध करण्याचा ध्यास बाळगून राबवण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब या नावीन्यपूर्ण कार्यशाळेतूनही उमटले. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनामध्ये गोवा विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव विजया आम्ब्रे यांनी विशेष परिश्रम घेतले.