नैसर्गिक, समूह शेतीवर भर देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2024 12:59 PM2024-09-01T12:59:30+5:302024-09-01T13:01:16+5:30

केंद्रीय कृषिमंत्र्यांचा 'संवाद' कार्यक्रम

emphasis on natural group farming said cm pramod sawant | नैसर्गिक, समूह शेतीवर भर देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

नैसर्गिक, समूह शेतीवर भर देणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : नैसर्गिक, प्राकृतिक व समूह शेतीवर भर देऊन आधुनिक तंत्राचा वापर करून कृषी क्षेत्रात अनेकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

साखळी येथे केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा ऑनलाइन पद्धतीने थेट संवाद कार्यक्रम झाला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते. राज्यात कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्याचा आमचा निर्धार असून केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या सूचना राज्यात तत्परतेने अंमलात आणून नवी क्रांती घडविण्यासाठी राज्य सरकार कार्यरत राहणार असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा मिशनअंतर्गत प्राकृतिक शेती व समूह शेतीवर भर देण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. नैसर्गिक शेतीला मोठ्या प्रमाणात चालना देताना नवयुवकांना शेतीची आवड निर्माण करून कुठेही जमीन पडीक राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या थेट संवाद व मार्गदर्शन कार्यक्रमात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकरी, कृषी अधिकारी १९१ पंचायतींचे सरपंच, सदस्य, १४ पालिका व शेतकऱ्यांशी संवाद साधून सर्वांना प्रेरणा दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत अंतर्गत शेती, शेतकरी, उत्पादन यावर विशेष भर दिला असून हा मंत्र आम्ही तातडीने अमलात आणून गोव्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी थेट संवाद साधताना कृषिमंत्र्यांनी मुख्यमंत्री सावंत यांचे कौतुक केले. त्यांनी गोव्यात शेतीसंदर्भात केलेले प्रयोग देशातील इतर राज्यातही चालीस लावण्याची हमी दिली. यावेळी मोठ्या संख्येत शेतकरी उपस्थित होते.
 

Web Title: emphasis on natural group farming said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.