कोकणी भाषेच्या प्रचार, विस्तारावर भर द्या; मुख्यमंत्री सावंत यांचे युवकांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2024 12:43 PM2024-02-05T12:43:42+5:302024-02-05T12:44:51+5:30
राजभाषा पुरस्कारांचे वितरण.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोकणी भाषा केवळ राज्य भाषा म्हणून मिरवण्यात काहीच अर्थ नाही, तर कोकणीचा विकास योग्यरित्या होणे आवश्यक आहे. कोकणी भाषेसाठी वावरणाऱ्यांनी कोकणी भाषेचा प्रचार व विस्तार करण्यावर भर द्यावा. युवकांनी पुढाकार घेऊन दर्जेदार कोकणी साहित्य निर्मिती करावी. यासाठी गोवा कोकणी अकादमी आणि कोकणीसाठी कार्य करणाऱ्या इतर संस्थांना सरकारचा नेहमीच पाठिंबा असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
गोवा राजभाषा संचालनालयातर्फे, गोवा कोकणी अकादमीच्या सहाय्याने राजभाषा दिनाचे औचित्य साधून दोनापावला येथील राजभवनच्या दरबार सभागृहात २०१९-२०, २०२०- २१ आणि २०२१-२२ या वर्षांसाठीच्या राजभाषा पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. सन्मानिय पाहुणे म्हणून दिल्ली साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक व कार्याध्यक्ष म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक दामोदर मावजो, गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष वसंत सावंत, सचिव मेघना शेटगावकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
अनेक वर्षानंतर भाषा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने, साहित्यिकांना चांगले दिवस आले, असे म्हणण्यास काहीच हरकत नाही. कोकणी अकादमी राज्यात चांगले काम करत आहे, पण इतर राज्यांज्या तुलनेत आम्ही कुठेतरी कमी पडतो, असे वाटत आहे. त्यामुळे यापुढे अकादमीने अधिक जोमात काम करावे. महत्त्वाचे म्हणजे कोकणी भाषेचे अनुवादक मिळणे कठीण झाले आहे, त्यामुळे युवकांना अनुवादक म्हणून करीयर करण्याची संधी चालून आली आहे, भविष्यात देशातही अनेक कोकणी भाषेच्या अनुवादकांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सावंत यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी दामोदर मावजो, व माधव कौशिक यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
पुरस्कार प्राप्त मान्यवर
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त रवींद्र केळकर कोकणी भाषा पुरस्कार २०१९-२० वर्षासाठी पुंडलिक नारायण नाईक यांना, २०२०-२१ वर्षासाठीचा पुरस्कार मीना सुरेश काकोडकर यांना, तर २०२१-२२ चा पुरस्कार अशोक पांडुरंग भोसले यांना प्रदान करण्यात आला. बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठीचा उल्हास कुशल प्रभूदेसाई यांना, २०२०-२१ वर्षासाठीचा डॉ. सोमनाथ दत्ता कोमरपंत, व २०२१-२२ वर्षासाठीचा गुरुदास सीताराम सावळ प्रदान करण्यात आला. २०१९-२० वर्षासाठीचा दुर्गाराम उपाध्याय संस्कृत भाषा पुरस्कार लक्ष्मण कृष्णा पित्रे आणि २०२०- २१ या वर्षासाठीचा पुरस्कर मनोहर दत्ताराम आमशेकर यांना प्रदान करण्यात आला.