पंतप्रधानांच्या शाबासकीमुळे प्रोत्साहन मिळाले: विश्वजित राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2024 01:54 PM2024-05-02T13:54:54+5:302024-05-02T13:56:44+5:30
प्रतापसिंग राणेंचा श्रीपादभाऊ यांनाच पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रतापसिंह राणे यांनी काँग्रेसमध्ये असूनही उत्तर गोवा लोकमत न्यूज नेटवर्क लोकसभा मतदारसंघात नेहमीच भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच श्रीपादभाऊना सत्तरीत वेळोवेळी मताधिक्य मिळाले आहे, असा दावा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केला.
काल, बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोबत प्रदेश भाजपचे सरचिटणीस दामू नाईक व साळगावचे आमदार केदार नाईक उपस्थित होते. राणे म्हणाले की, यावेळीही सत्तरी तालुक्यात श्रीपाद नाईक यांचा मताधिक्क्याच्या बाबतीत इतिहास घडणार आहे. माझे वडील प्रतापसिंह राणे यांचे या निवडणुकीतही त्यांनाच समर्थन आहे. या बाबतीत ते माझ्याशी बोललेही आहेत. प्रतापसिंह राणे यांचे श्रीपादभाऊ तसेच भाजपमधील इतर काही नेत्यांकडे वेगळेच नाते आहे. त्यांनी नेहमीच गोव्याच्या विकासाचा ध्यास घेतला. मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक विकासकामे केली. त्यानंतर मनोहर पर्रीकर व आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही चांगले काम करत आहेत. पर्रीकर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी सावंत यांनी भरून काढलेली आहे, असेही राणे म्हणाले.
दरम्यान, सांकवाळ येथील जाहीर सभेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यासपीठावर विश्वजीत यांचे दंड थोपटले होते. तसेच त्यांच्याशी बोलणेही झाले होते. त्याबद्दल विचारले असता विश्वजीत म्हणाले की, मोदीजींनी दंड थोपटणे हे माझे नेतृत्व व सत्तरीतील कामाची पावती असावी. मोदीजींनी दिलेल्या शाबासकीमुळे मला प्रोत्साहन मिळाले आहे. या घटनेतून कोणीही वेगळा अर्थ काढू नये.
भाजप व संघाच्या विचारधारेशी एकरूप
विश्वजीत राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शब्द दिला तेव्हापासूनच मी भाजपची विचारधारा स्वीकारली. केवळ भाजपच नव्हे तर संघाच्या विचारधारेशीही मी एकरूप झालेलो आहे. भाजप व संघाचे काम मी मनापासून करीत आहे. ख्रिस्ती, मुस्लिम अशा सर्व धर्मीयांमध्ये माझे चांगले संबंध आहेत.
माणुसकीच्या भावनेतून महिलेला घर बांधून देईन
राजकारणात असलो तरी मी माणुसकी जोपासली आहे. इतरांप्रमाणे समाज तोडण्याचे काम करत नाही. गरीब, गरजू महिलेला माणुसकीच्या भावनेतूनच घर बांधून देण्यास पुढाकार घेतला. पक्ष म्हणून भाजपचेही वेगवेगळे समाजोयोगी उपक्रम आहेत. महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स वाटण्यापासून इतर सर्व प्रकारची मदत दिली जाते, असेही राणे म्हणाले.