पावसाळा संपण्यापूर्वीच कैऱ्या बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 06:19 PM2018-10-08T18:19:58+5:302018-10-08T18:20:18+5:30
म्हापसा : पावसाळी हंगाम अद्याप संपलेला नसताना गोमंतकातील बाजारपेठेत कैऱ्या दाखल झाल्या आहेत. कैऱ्या सर्वप्रथम बाजारात उपलब्ध करुन देण्यात ओशेल येथील आंबा व्यावसायीक समीर धारगळकर यांना पुन्हा एकदा यश आले आहे. पुढील काही दिवसात दिवाळीपर्यंत आंबा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
आंब्यांच्या केलेल्या चांगल्या प्रकारच्या मशागतीच्या जोरावर मागील काही वर्षांपासून धारगळकर सततपणे कैऱ्या बाजारात उपलब्ध करुन देतात. आंब्या प्रमाणे तेवढ्याच आवडीने कैऱ्यांचा वापर करणाऱ्या गोमंतकीयांना शंभर रुपयात दोन या प्रमाणे कैऱ्यांची विक्री त्यांनी करायला सुरुवात केली आहे. म्हापसापासून जवळ असलेल्या शिवोली येथील बाजारपेठेत त्यांनी या कैऱ्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. हंगामातील पहिल्यास कैऱ्या विकत घेण्यासाठी ग्राहकांकडून त्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसादही लाभला होता.
याबाबत धारगळकर यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले राज्यातील आंबा हंगामाची सुरुवात साधारण मार्च महिन्यात होते. हा हंगामा साधारण तीन महिने चालतो. सध्या ऑक्टोबर महिना चालू आहे. अजुन पाच महिने आहेत; पण आताच कैऱ्या बाजारात उपलब्ध केल्या आहेत. यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे, गेल्या अनेक वर्षांपासून बाजारात सर्वप्रथम कैºया उपलब्ध करणे शक्य झाले आहे. येत्या काही दिवसात पिकलेले आंबे बाजारात आणले जाणार असल्याचे धारगळकर यानी सांगितले.