नोकरीकांडाची आता ईडीकडून चौकशी; केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली गंभीर दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2024 09:39 AM2024-12-11T09:39:49+5:302024-12-11T09:41:08+5:30
तपासकामाच्या फाईल्स मागवल्या; पोलिसांचीही कसोटीच
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय झालेल्या गोव्यातील नोकऱ्या विक्री घोटाळ्याची दखल अखेर केंद्र सरकारच्या 'ईडी' यंत्रणेने घेतली आहे. ईडीने प्राथमिक तपासकाम सुरू केले आहे. यामुळे गोवा पोलिसांची देखील आता कसोटी लागेल. केंद्रीय गृह मंत्रालय व पंतप्रधान कार्यालयापर्यंत गोव्याच्या या नोकरी महाघोटाळ्याची माहिती पोहोचली आहे.
नोकऱ्या विक्री प्रकरणात ईडीने तपास सुरू केला आहे. या प्रकरणांमधील फाइल्स गोवा पोलिसांकडून मागवल्या आहेत. मोठा आर्थिक व्यवहार झाल्याने मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ईडीने चौकशी सुरू केली असून त्यामुळे काहीजणांचे धाबे दणाणले आहेत. सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी राज्यातील वेगवेगळ्या पोलिस स्थानकांवर ३३ हुन अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत. उत्तर गोव्यात २०, तर दक्षिण गोव्यात १३ गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली आहे. आतापर्यंत ३०० हून अधिक जणांची फसवणूक झाल्याचे तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे.
या घोटाळ्याशी कोणताही राजकीय संबंध असण्याची शक्यता नाकारली जात असली तरी संघटित रॅकेट कार्यरत आहे. मोठ्या प्रमाणात पैशांची देवाण-घेवाण झाल्याने व ती कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याने ईडी अधिकाऱ्यांना चौकशी करणे भाग पडले. २०१४-१५ पासून नोकऱ्या विक्री घोटाळा चालू असल्याचे सांगितले जाते.
सार्वजनिक बांधकाम, जलस्रोत, शिक्षण, वाहतूक खात्यांसह महसूल, पोलिस आणि आरोग्य खात्यातही नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक झालेली आहे. सरकारी नोकरी आपल्याला सुरक्षित भविष्याकडे नेईल या विश्वासाने लोकांनी आपले दागिने गहाण ठेवून किंवा कर्जे काढून पैसे दिले.
मोठे रॅकेट
- म्हार्दोळ पोलिस स्थानकात पूजा नाईक हिच्याविरुद्ध पहिला गुन्हा नोंद झाल्यानंतर अन्य पोलिस स्थानकांमध्येही गुन्हे दाखल झाले. आठ महिलांविरुद्ध गुन्हे नोंद होऊन त्यांना अटकही झाली, डिचोली, बार्देश, तिसवाडी, फोंडा, मुरगाव व काणकोण तालुक्यांमध्ये फसवणुकीचे प्रकार घडले आहेत.
- आतापर्यंत एकूण २१ जणांना अटक झाली असून, पोलिस कर्मचाऱ्यांपासून ते वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत तसेच शिक्षकांचाही यात समावेश आहे. पूजा नाईक, दीपश्री गावस ऊर्फ दीपश्री प्रशांत म्हातो, प्रिया यादव, सुनीता शशिकांत पावसकर, श्रुती प्रभुगावकर, उमा पाटील अशी आजवर अटक झालेल्या महिलांची नावे आहेत.
गृहमंत्री शहांपर्यंत पोहोचली माहिती
गोव्यातील नोकऱ्या विक्रीचे प्रकरण दिल्लीतही गाजत आहे. विरोधकांनी दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन गोवा सरकारवर हल्लाबोल केला आहे. तथापी, गोव्यातील नोकरी घोटाळ्याची माहिती गेल्या पंधरवड्यातच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल. संतोष यांची यापूर्वी गोव्यातील काही भाजप नेत्यांशी चर्चा झाली आहे.