समुद्रात 'सिंधु साधना'चे इंजिन निकामी; ३६ जणांची धडधड वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 01:05 PM2023-07-28T13:05:50+5:302023-07-28T13:13:02+5:30
कारवारनजीक तटरक्षक दलाचे बचावकार्य संशोधकांना जीवदान.
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे 'सिंधु साधना' है संशोधन जहाज कारवारच्या दिशेने जात असताना संकटात सापडले होते. जहाजाचे इंजिन पूर्णपणे निकामी झाले होते. याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने धाडसी बचाव कार्य करून ३६ जणांचे प्राण वाचविले. बुधवारी दुपारी हा प्रकार घडला.
जहाजाचे इंजिन निकामी झाल्याने ते गतिहीन होऊन समुद्राच्या प्रवाहावर चालत होते. बुधवारी दुपारी एक वाजता तटरक्षक दलाच्या जिल्हा मुख्यालयात यासंबंधीचा संदेश प्राप्त झाला. 'सिंधु साधना' जहाज बहुमोल वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज आणि महत्वपूर्ण संशोधन माहिती घेऊन जात असल्याने परिस्थिती गंभीर होती.
जहाजामध्ये ३६ जणांपैकी ८ एस्टीम संशोधक आहेत. संशोधकांची उपकरणे होती. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील कारवार किनाऱ्यापासून हे जहाज जवळ असल्याने तेलगळतीचा धोका होण्याची शक्यता होती. त्यामुळे सागरी पर्यावरणाचीही हानी झाली असती. याबाबत माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने आयसीजीएस सुजित आणि आयसीजीएस वराह या दोन अत्याधुनिक जहाजांवर कुशल पथकांच्या मदतीने बचाव मोहीम सुरू केली. तटरक्षक दलाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या.
आज गोव्यात पोहोचणार
अतिशय प्रतिकूल हवामानात, समुद्रातील लाटा आणि ४५ नोटिकल मैलांपर्यंत वारे 'वाहत असतानाही तटरक्षक दलाने संकटात सापडलेल्या सीएसआयआर- एनआयओ जहाजाच्या बचावाची मोहीम हाती घेतली. आयसीजीएस सुजितने 'सिंधू साधना जहाजाला यशस्वीरीत्या टोईंग केले. ही दोन्ही जहाजे आता गोव्याच्या दिशेने येत आहेत. ती आज, शुक्रवारी सकाळी दहा वाजेपर्यंत मुरगाव बंदरावर पोहोचण्याची अपेक्षा आहे.
जहाजावर काय?
सिंधु साधना जहाज बहुमोल वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज आणि महत्त्वपूर्ण संशोधन माहिती घेऊन जात होते. जहाजावरील ३६ जणांमध्ये आठ एस्टीम संशोधक होते.