अनियमित पाणीपुरवठ्यावरून साकोर्डा येथे अभियंत्यांना घेराव
By आप्पा बुवा | Published: May 3, 2023 08:07 PM2023-05-03T20:07:25+5:302023-05-03T20:07:34+5:30
यावेळी सुमारे 90 ग्रामस्थांनी सह्या केलेले निवेदनसुद्धा अभियंते पवन शेट यांना देण्यात आले.
फोंडा - अनियमित पाणीपुरवठ्यामुळे हैराण झालेल्या नवें साकोर्डा येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना घेराव घालून जाब विचारला. सुमारे दीडशे लोक या वेळी उपस्थित होते. यावेळी सुमारे 90 ग्रामस्थांनी सह्या केलेले निवेदनसुद्धा अभियंते पवन शेट यांना देण्यात आले.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या भागात पाण्याचा पुरवठा अनियमित असतो. नळाला पाणी कधीतरी येते. नळामधून येणारे पाणी बारीक धारेचे असते. परत आलेले पाणी लगेच बंद केले जाते. पाण्याच्या पुरवठा अगोदरच कमी त्यात परत काही वेळा चक्क प्रदूषित पाणी लोकांच्या नळामधून येते. ज्यावेळी त्या भागातील वीज जाते त्यावेळी पाणी पुरवठा हमखास बंद केला जातो. साकोर्डा भागात नैसर्गिक जलस्त्रोते आहेत परंतु त्यांचे योग्य नियोजन होत नाही. नवे साकोर्डा भागातील नागरिकांच्या हक्काचे पाणी इतर ठिकाणी वळवण्यात येते . ह्यासंबंधी प्रश्न विचारून नागरिकांनी अभियंतांना भांडावून सोडले.
सदर प्रभागाचे पंच सदस्य महादेव शेटकर हे सुद्धा नागरिकांना येऊन मिळाले. त्यांनी सुद्धा अभियंत्यांवर चांगलाच रोष व्यक्त करताना पाणी प्रश्नावर जाब विचारले.
शेटकर यांच्या म्हणण्यानुसार या भागात जी जलवाहिनी आहे ती वीस वर्षांपूर्वी घालण्यात आली होती. आताच्या काळात लोकांच्या गरजा वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर नळ जोडण्या सुद्धा वाढलेल्या आहेत. परिणामी या जुन्या पाईपलाईन मधून जो पुरवठा होतो तो अपुरा पडतो.योग्य नियोजन न करता पाणी पुरविण्यात येते.परत काही वेळा पाणी प्रक्रिया न करताच सोडले जात आहे. ह्या प्रदूषित पाण्यामुळे सदर भागात आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. तेव्हा सरकारने किमान आठ तास स्वच्छ पाण्याचा पुरवठा या भागात करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
नागरिकांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अभियंतानी त्यांना दोन दिवसाच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. सदर आश्वासन दिल्यानंतर नागरिक परत फिरले. परंतु दोन दिवसानंतर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोठ्या संख्येने सार्वजनिक बांधकाम खात्यावर मोर्चा नेण्यात येणार असल्याची धमकी यावेळी देण्यात आली आहे.