अभियंत्यांचे धाबे दणाणले; नोटिसा जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2024 11:05 AM2024-08-15T11:05:08+5:302024-08-15T11:05:46+5:30
खड्ड्यांसाठी धरले जबाबदार; मुख्यमंत्र्यांनी कंत्राटदारांनाही ठणकावले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास यापुढे संबंधित विभागाचे अभियंते जबाबदार असतील व त्यांच्यावरच काठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सकाळी दिला आणि त्यानंतर काही तासातच धडाधड अभियंत्यांच्या हातात नोटिसाही पडल्या. या प्रकारामुळे बांधकाम खात्यातील अभियंत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बांधकाम खात्याच्या अभियंत्यांच्या बैठकीत कारभाराचा 'पंचनामा'च केला. रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम केलेल्या शंभराहून अधिक कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. खड्ड्यांच्या बाबतीत संबंधित विभागाच्या अभियंत्यांनाही जबाबदार धरले आहे.
बांधकाम खात्याच्या सहाय्यक अभियंत्यांपासून प्रधान मुख्य - अभियंत्यांपर्यंत सर्वांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी चतुर्थीपूर्वी सर्व खड्डे बुजवा, असे निर्देश दिले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यांची झालेली दुर्दशा तसेच आगामी काळात हाती घ्यावयाची कामे याबाबत त्यांनी जाणून घेतले. बैठकीनंतर पत्रकारांशी
बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आतापर्यंत शंभरहून अधिक कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावलेल्या आहेत. आगामी काळात अशाच प्रकारच्या नोटिसा अभियंत्यांनाही जातील. त्यामुळे त्यांनी कोणत्याही रस्त्याचे काम करून घेताना बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. येत्या चतुर्थीपूर्वी सर्व खड्डे बुजवले जातील. तसे मी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत.
सध्या राजधानी पणजी परिसरातील दुरवस्था झालेल्या रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. पावसाळा संपताच राज्यभरातील रस्त्यांचे काम हाती घेतले जाणार असून त्या कामावर सरकारचे लक्ष राहणार आहे.
'इंटिग्रेटेड सिस्टम करणार पोलखोल
१ ऑक्टोबरपासून 'इंटिग्रेटेड मॅनेजमेंट सिस्टम' लागू होणार आहे. त्यामुळे राज्याच्या कुठल्या भागात किती किलोमीटरचा रस्ता बांधला आणि तो कधी बांधला?, बांधकामाचे कंत्राट कोणाकडे होते? तसेच कोणत्या अभियंत्याने काम पाहिले? या सर्व गोष्टींची नोंद होणार आहे. निकृष्ट दर्जाचे काम केल्यास कंत्राटदारांबरोबरच संबंधित विभागाचे अभियंतेही जबाबदार असतील. या सिस्टममध्ये सर्व संबंधित खात्यांना आम्ही सामावून घेणार आहोत व जबाबदारीही निश्चित केली करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कंत्राटदारांना स्वखर्चाने रस्ता काम करावे लागेल
पाऊस ओसरल्यावर ऑक्टोबरमध्ये रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगचे काम सुरू होईल. कंत्राटदारांनी जर निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले असेल तर त्याच कंत्राटदारांकडून पुन्हा रस्त्याचे काम करून घेतले जाईल. त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च सरकार करणार नाही. कंत्राटदारांना स्वतःच्या पैशातूनच हे काम करून द्यावे लागेल. याबाबतीत कोणाचीही गय केली जाणार नाही. अभियंत्यांनी जबाबदारीने काम करावे खड्यामुळे अपघात झाले तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आठ दिवसांत उत्तर द्या...
बैलापूर पूल ते चांदेल पाणी प्रकल्पापर्यंतच्या निकृष्ट कामासाठी रवळनाथ कन्स्ट्रक्शन कंपनीला नोटीस बजावून ८ दिवसात उत्तर देण्यास सांगितले आहे. अशाच प्रकारे दुर्भाट येथील कपिलेश्वर फेरी पॉइंटजवळ केलेल्या निकृष्ट कामाबद्दल दुर्भाटकर कन्स्ट्रक्शन कंपनी, मडकई येथे फेरी धक्क्याजवळ हॉटमिक्सिंगच्या निकृष्ट कामाबद्दल आगियार कन्स्ट्रक्शन्स, ओ कोकेरो ते पर्वरी तिस्क दरम्यानच्या निकृष्ट कामासाठी रेस कन्स्ट्रक्शन्स अशाच प्रकारे अन्य कंत्राटदारांनाही निकृष्ट कामाबद्दल नोटिसा बजावल्या आहेत.