मोपा विमानतळाला पर्यावरणीय मंजुरी, केंद्रीय मंत्री जावडेकरांकडून घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:00 PM2020-03-12T15:00:48+5:302020-03-12T15:01:10+5:30
मोपा येथील विमानतळाचा विषय पूर्वी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला होता. न्यायालयीन खटल्यामुळे विमानतळाचे वर्षभर काम बंद राहिले होते.
पणजी : मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली असल्याची घोषणा केंद्रीय वन व पर्यावरण खात्याचे मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. जावडेकर यांनी तसे ट्विटरवरून जाहीर केले आहे. आपण गुरुवारी मोपा येथील ग्रीनफिल्ड विमानतळाला पर्यावरण मंजुरी दिली, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. तसेच यामुळे मोपाच्या पूर्ण भागातील एकूण विकासाला चालना मिळेल व गोव्याच्या पर्यटनालाही बळकटी मिळेल, असा विश्वास जावडेकर यांनी व्यक्त केला आहे.
मोपा येथील विमानतळाचा विषय पूर्वी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचला होता. न्यायालयीन खटल्यामुळे विमानतळाचे वर्षभर काम बंद राहिले होते. जीएमआर कंपनीला सरकारने हा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभा करण्याचे काम दिलेले आहे. यापूर्वी सदोष पर्यावरणीय परिणाम अभ्यासामुळे मोपा विमानतळाचा पर्यावरणीय दाखला निलंबित झाला होता. नंतर नव्याने पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास केला केला. त्यामुळे दाखल्यावरील ते निलंबन मागे घेतले गेले. आता मोपा विमानतळाचे काम नव्याने सुरू होणार आहे. डिसेंबर 2020 मध्ये मोपा विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करावे असे अगोदर सरकारने ठरविले होते पण आता पहिल्या टप्प्यातील काम 2021 साली पूर्ण होईल असे सरकारचे म्हणणो आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी राज्याच्या नव्या अर्थसंकल्पातूनही तसे सूतोवाच केले आहे.
सरकारने विमानतळासाठी पाच गावातील सुमारे 90 लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा विमानतळासाठी ताब्यात घेऊन ती कंत्रटदार कंपनीला दिली आहे. विमानतळ बांधताना झाडे कापावी लागतील हा यापूर्वी वादाचा मुद्दा बनला होता. न्यायालयाने त्याची दखल घेऊन काही सूचना व अटींचे पालन करण्यास सरकारला, केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाला व कंत्रटदार कंपनीलाही सांगितले आहे. अटींचे पालन होते की नाही हे पाहण्याचे काम निरी या संस्थेकडून केले जाणार आहे. जेवढी झाडे कापली जातात, त्याच्या अधिक संख्येने झाडे लावावी लागतील, असे अपेक्षित आहे.