मुळगांव येथे येणार ईएसआय इस्पितळ, इमारत आराखड्याचे काम सुरू
By किशोर कुबल | Published: January 17, 2024 06:12 PM2024-01-17T18:12:39+5:302024-01-17T18:14:05+5:30
कामगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी काल ईएसआय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेऊन या प्रकल्पाबाबत चर्चा केली.
पणजी : मुळगांव, डिचोली येथे २० हजार चौ. मी. जागेत १५० खाटांचे ईएसआय इस्पितळ येणार असून त्यासाठी इमारत आराखडा तयार केला जात आहे.
कामगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी काल ईएसआय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेऊन या प्रकल्पाबाबत चर्चा केली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अशी माहिती दिली की,‘ सध्या हा प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यावर आहे. इमारतीचा आराखडा तयार केला जात असून ईएसआयच्या केंद्रीय कार्यालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित इमारतीचे काम हाती घेतले जाईल. शक्य तितक्या लवकर हे बांधकाम सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे.’
बाबुश म्हणाले की,‘ इमारतीचे डिझाइन वगैरे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आर्किटेक्टकडून करुन घेतले जाईल. मुळगांव येथे हे इस्पितळ झाल्यानंतर कामगारांना त्याचा बराच फायदा होईल. या इस्पितळासाठी गृह निर्माण मंडळाकडून २० हजार चौरस मिटर जमीन घेतली आहे.
दरम्यान, पर्येंच्या आमदार दिव्या राणे यांनी आपल्या मतदारसंघातील आल्वारा जमीनधारकांच्या प्रश्नावर बाबुश यांची भेट घेतली. त्याबद्दल विचारले असता बाबुश म्हणाले की, ‘हा प्रश्न निकालात काढण्यासाठी कायद्यात काही दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत, त्या केल्या जातील. तसे आश्वासन मी दिव्या यांना दिले आहे.’