तेरेखोल हॉटेल जमीनप्रश्नी चौकशी समिती स्थापन
By admin | Published: September 11, 2015 02:00 AM2015-09-11T02:00:47+5:302015-09-11T02:00:58+5:30
पणजी : तेरेखोल येथील लिडिंग हॉटेल प्रकल्पाशी निगडित जमिनीचा वाद गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.
पणजी : तेरेखोल येथील लिडिंग हॉटेल प्रकल्पाशी निगडित जमिनीचा वाद गाजत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. ती जमीन खरोखर कुळांची आहे काय, याचा शोध घेण्याचे काम या समितीवर सोपविण्यात आले आहे. तीन महिन्यांत समितीचा अहवाल सरकारला अपेक्षित आहे.
सेंट अँथनी मुंडकार व कूळ संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास तेरेखोल येथील लिडिंग हॉटेल जमीनप्रश्नी यापूर्वी याचिका सादर केलेली आहे. सरकारचे नगर नियोजन खाते व अन्य तेरा जणांना याबाबत प्रतिवादी करण्यात आले आहे. कुळांच्या कृषी जमिनी हॉटेल कंपनीने खरेदी केल्या व मग त्यांचे रूपांतर बिगर शेतजमिनीत करण्यात आल्याचा मुंडकार व कूळ संघटनेचा आरोप आहे.
कुळांच्या जमिनींचे रक्षण करणे हे सरकारचे धोरण असून आम्ही तेरेखोलप्रश्नी चौकशी करून घेऊ, अशी ग्वाही सरकारने न्यायालयास प्रतिज्ञापत्र सादर करून दिली होती. त्यानुसार आता गोवा क्रीडा प्राधिकरणाचे संचालक संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने चौकशी समिती सादर केली आहे.
समितीने तीन महिन्यांत स्वत:चे निष्कर्ष व शिफारशी यांचा समावेश करून अहवाल सादर करावा, असे आदेशात महसूल खात्याचे अव्वल सचिव आशुतोष आपटे यांनी म्हटले आहे.
(खास प्रतिनिधी)