दहावी नापासांनाही आता नोकरी - मुख्यमंत्री
By किशोर कुबल | Published: December 18, 2023 03:15 PM2023-12-18T15:15:14+5:302023-12-18T15:15:46+5:30
अनुत्तीर्णांनी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास शालांत समकक्ष
पणजी :गोवा बोर्डाच्या शालांत किंवा उच्च माध्यमिक परीक्षेत नापास झाल्यास आता नोकरीसाठी चिंता करण्याचे कारण नाही. दहावी अनुत्तीर्णांनी आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे गृहीत धरुन उमेदवार नोकरीस पात्र ठरतील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. पर्वरी येथे ४१ कोटी रुपये खर्चून बांधलेल्या गोवा बोर्डाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की,‘दहावी उत्तीर्ण होऊन दोन वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला तरी बारावी उत्तीर्ण झाल्याचे गृहीत धरले जाईल. गोवा बोर्डाने बाह्य परीक्षा प्रक्रिया सुटसुटीत करावी, जेणेकरुन रिपीटर्सना संधी मिळेल. इतर राज्यांच्या बोर्डाकडून बोगस प्रमाणपत्रे आणण्याचे प्रकारही बंद होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘शिक्षण क्षेत्रात नोकऱ्यांसाठी नव्हे तर कौशल्यासाठी सुधारणा यायला हव्यात.’
४ गुणांनी एमबीबएस हुकले!
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘खरे तर मी एमबीबीएस डॉक्टर बनणार होतो. परंतु ४ गुण कमी मिळाल्याने प्रवेश हुकला व आयुर्वेदिक डॉक्टर झालो. दहावीत मला त्यावेळी ५९.५ टक्के गुण मिळाले होते. प्रथम श्रेणी अवघ्या ०.५ टक्क्यांनी हुकली. बारावीच्या परीक्षेत मला ७८ टक्के गुण मिळाले मात्र एमबीबीएस प्रवेश मिळाला नाही.’
दरम्यान, स्थानिक आमदार तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे, गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये याप्रसंगी उपस्थित होते.