सीसीटीव्ही बंद, जॅमरही जाम... कोलवाळच्या तुरुंगाच्या भिंतीही ताराविना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 02:22 PM2019-01-19T14:22:10+5:302019-01-19T14:39:58+5:30
कैद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी लावले गेलेले सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित चालत नाहीत. तुरुंगात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणारे मेटल डिटेक्टर बंद आहेत.
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - कैद्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी लावले गेलेले सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित चालत नाहीत. तुरुंगात येणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणारे मेटल डिटेक्टर बंद आहेत. तुरुंगातल्या जॅमरचाही उपयोग होत नाही. एवढेच नव्हे तर कैद्यांना भिंतीवरुन उडी घेऊन पळता येऊ नये यासाठी भिंतीवर जे तारांचे कुंपण लावले जाते त्याचाही अजुन पत्ता नाही. स्टेट ऑफ द आर्ट तुरुंग म्हणून ज्याची यापुर्वी जाहिरात केली गेली होती त्या कोलवाळ येथील मध्यवर्ती तुरुंगाची ही स्थिती असून सध्या या तुरुंगाची गत नाव मोठे पण लक्षण खोटे अशी झाली आहे.
रस्ते खणल्यामुळे या तुरुंगातील इंटरनेट कनेक्टीव्हिटी बंद पडल्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारखी सेवा मागचा कित्येक काळ बंद असण्याच्या पार्श्वभूमीवर या अत्याधुनिक सुरक्षा सुविधा असतील अशी जाहिरात केल्या गेलेल्या या तुरुंगाच्या एकूणच स्थितीचा आढावा घेतला असता ही वस्तुस्थिती पुढे आली. या तुरुंगात मेटल डिटेक्टर चालत नसल्यामुळे कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांची कित्येकदा कपडे काढून तपासणी केली जाते. यातून महिलाही सुटत नाहीत अशी खळबळजनक माहिती येथील काही सुरक्षा रक्षकांनी दिली. अशा प्रकारे तपासणी केली गेल्यामुळे या सुरक्षा रक्षकांना कैद्यांच्या रोषालाही सामोरे जावे लागते.
कैदी खुलेआम या तुरुंगातून मोबाईलचा वापर करतात हे अनेकदा उघड झाले आहे. अशा प्रकारे मोबाईल वापरता येऊ नये यासाठी तुरुंगात जॅमरचा वापर केला जातो. मात्र कोलवाळच्या तुरुंगात ही यंत्रणाच बंद पडली आहे. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांकडे असलेले वॉकी टॉकीही कित्येकदा कनेक्टीव्हिटीच्या अभावामुळे व्यवस्थित चालत नसल्याची माहितीही पुढे आली आहे.
तुरुंग महानिरीक्षक राजेंद्र मिरजकर यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले, यातील काही गोष्टी खऱ्या असल्या तरी काही बाबतीत अतिशयोक्ती असल्याचे ते म्हणाले. या तुरुंगाचा सर्व्हर जुना आहे त्यामुळे कनेक्टीव्हिटीची समस्या कित्येकवेळा निर्माण होते. हा सर्व्हर बदलावा अशी मागणी आम्ही गेल इंडिया या तुरुंगाच्या यंत्रणोची देखरेख करणाऱ्या कंपनीकडे केली आहे. मात्र प्रत्येकवेळी या कंपनीकडून सर्व्हर बदलण्यासाठी अतिरिक्त वेळ मागून घेतला जात आहे. त्यामुळे अशा समस्या निर्माण होतात असे ते म्हणाले.
या तथाकथित अत्याधुनिक तुरुंगात वाहनांचीही व्यवस्था पुरेशी नसल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. या तुरुंगासाठी केवळ दोनच वाहने दिली गेली आहेत. पण ही वाहने अत्यंत खराब स्थितीतील आहेत. सडा जेलमध्ये असलेली जुनी सुमो जीप आणि आग्वाद तुरुंगात असलेली जुनी रुग्णवाहीका अशी केवळ दोन वाहने या जेलला दिली आहेत. या तुरुंगात कायमस्वरुपी डॉक्टरांचीही नेमणूक केलेली नाही. या तुरुंगात सुमारे 550 कैदी असून त्यांना तपासण्यासाठी या तुरुंगात पूर्णवेळ डॉक्टरांची नेमणूक केलेली नाही. आठवडय़ातून एकदा किंवा दोनदा केवळ तीन तासासाठी तुरुंगात डॉक्टर येत असतो अशी माहिती प्राप्त झाली आहे. याही संदर्भात महानिरीक्षक मिरजकर यांना विचारले असता, गोव्यातील तुरुंगासाठी चार डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मान्यता गोवा सरकारकडून मिळाली आहे. त्याबाबत आरोग्य खात्यालाही कळवलेले आहे. कोलवाळ तुरुंगात कायमस्वरुपी डॉक्टराची नेमणूक केली जाईल असे ते म्हणाले.
कैद्याच्याच सेलमध्ये अधिकाऱ्यांची केबिन 117 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा मध्यवर्ती तुरुंग अजूनही पूर्ण झालेला नाही. या तुरुंगाचा प्रशासकीय ब्लॉक अजुनही बांधण्यात न आल्यामुळे जेलर आणि इतर अधिकाऱ्यांची कार्यालये कैद्याच्याच सेलमध्ये सध्या तात्पुरत्या स्वरुपात चालू आहेत. या तुरुंगामध्ये अजुन व्हिजीटर्स गॅलरीचेही बांधकाम झालेले नाही. तुरुंगातील कर्मचाऱ्यांची संख्याही बऱ्याच कमी प्रमाणात असून या तुरुंगाची स्थिती पाहिल्यास आतापर्यंत या तुरुंगातून अजुन कुणी पळून कसे गेले नाही हेच नवल असे म्हणावे लागेल.