कोविडच्या छायेतही रशियन आणि ब्रिटीश चार्टर कंपन्यांची गोव्याला पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 10:49 PM2020-09-11T22:49:41+5:302020-09-11T22:50:09+5:30
एअरलायन कंपन्यांकडून विचारणा : प्रतीक्षा केंद्राच्या निर्णयाची
मडगाव : कोविडमुळे गोव्यातील पर्यटन ठप्प झाले असले तरी येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या नवीन पर्यटन मोसमासाठी रशिया आणि ब्रिटिश चार्टर विमान कंपन्यानी रुची दाखविली आहे. असे जरी असले तरी आंतरराष्ट्रीय विमानसेवे बद्दल केंद्र सरकार काय निर्णय घेते त्यावर गोव्याच्या पर्यटनाचे भविष्य अवलंबून आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मोस्कॉच्या रॉयल फ्लाईटस आणि युकेच्या टीयूआय या दोन चार्टर विमान कंपन्यांनी आपल्यासाठी विमान स्लॉटस राखून ठेवण्याची मागणी केली आहे. रशियाच्या कंपनीने 26 ऑक्टोबर पासून आपल्याला 169 स्लोट्स राखीव ठेवावेत अशी मागणी केली आहे तर टीयूआय या ब्रिटिश कंपनीला दर आठवड्याला तीन ते पाच स्लोट्स हवेत.
रशियन आणि ब्रिटिश पर्यटकांचे गोवा हे आवडते ठिकाण असून या महामारीच्या काळातही त्यांनी गोव्याला पसंती दिली आहे याचे हे संकेत मानले जात आहेत. दरम्यान विदेशी कंपन्यांनी जरी अशी तयारी दाखविली असली तरी केंद्र सरकारने अजूनही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्याच धोरणावर गोव्यातील यंदाच्या पर्यटन मोसमाचे धोरण निश्चित होणार आहे. पर्यटन व्यवसायात असलेल्या व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातील पर्यटन मोसम ऑक्टोबर महिन्यात सुरू होत असला तरी विदेशी पर्यटक आपले बुकिंग एप्रिल मे महिन्यातच करत असतात . यंदा कोविडमुळे हे बुकिंग होऊ शकले नाही. केंद्र सरकारने आपले धोरण आताच जाहीर केले नाही तर यंदाचाही मोसम हातचा जाण्याची भीती या व्यावसायिकांनी व्यक्त केली.
यंदा गोव्यातील पर्यटनाला चालना द्यायची असेल तर केंद्र सरकारने ब्रिटन, रशिया आणि पोलंड या तीन देशांच्या सरकारकडे बोलणी करीन द्विपक्षीय करार करावा अशी मागणीही गोव्याच्या ट्रॅव्हल्स अँड टूरिझम या संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे. राज्य सरकारने हा विषय केंद्र सरकारकडे न्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.