बलशाही देश घडविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने योगदान देणे आवश्यक: श्रीपाद नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 09:22 AM2023-04-15T09:22:24+5:302023-04-15T09:23:06+5:30
मयेत विद्यार्थ्यांचा गौरव व मान्यवरांचा सत्कार.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: आम्हाला एक बलशाली देश घडवायचा आहे. प्रत्येक व्यक्तीने योगदान दिले तर हे घडू शकते. स्वतःचा विकास साधताना, गावचा विकास, राज्याचा विकास आणि पर्यायाने देशाचा विकास होत असतो, असे उद्गार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले.
शारदानगर, केळबाईवाडा, मये येथील शारदा वेलफेअर असोसिएशनचा १९ वा वर्धापनदिन आणि हनुमान देवस्थानचा ४ था प्रतिष्ठापनादिन सोहळ्यात नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, सरपंचा सुवर्णा चोडणकर, शारदा वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर मणेरकर, सचिव पुरुषोत्तम सूर्लकर आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण घेण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक प्रोत्साहन देणे, त्यांना सुसंस्कारित करणे, हे आपले कर्तव्य आहे. समाजाचा आपण एक घटक आहोत आणि समाजाप्रती आपली बांधीलकी आहे, याचे भावनेने काम केले, तर समाजात चांगल्या गोष्टी घडत असतात, असे केंद्रीय मंत्र्यांनी बारावीत, पदवी, पदविका परीक्षेत विशेष गुणवत्ता संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केल्यानंतर सांगितले.
मये मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहे. गावाच्या संदर्भात कुणाच्या समस्या असतील, तर त्या योग्य पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवा, असे आवाहन आमदार प्रेमेंद्र शेट यांनी यावेळी केले.
हनुमान जयंती उत्सवानिमित्त शारदानगर मयेच्या महिलांनी संगीत अमृत मोहिनी हे नाटक सादर केले. त्या कलाकारांचा केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी कलाचेतना वळवई निर्मित आणि राजदीप नाईक प्रस्तुत काहणी एका युगाची' हे कोकणी नाटक सादर करण्यात आले. प्रसिद्ध नाट्यकलाकार राजदीप नाईक यांचाही या कार्यक्रमात गौरव श्रीपाद नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन वनिता पाटील यांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"