प्रत्येक युवा गोमंतकीयाला रोजगार, नवे धोरण लवकरच : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 12:26 PM2018-08-16T12:26:00+5:302018-08-16T12:27:05+5:30
गोव्यातील प्रत्येक युवकाला रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी सरकारचे नवे रोजगार धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे सध्या उपचारांसाठी अमेरिकेत असून
पणजी : गोव्यातील प्रत्येक युवकाला रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी सरकारचे नवे रोजगार धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे सध्या उपचारांसाठी अमेरिकेत असून तिथून त्यांनी व्हीडीओद्वारे गोव्यात आपला संदेश पाठवला आहे. पर्रीकर येत्या रविवारी गोव्यात परतत आहेत. सोमवारपासून ते कामकाज सुरू करतील.
गोव्यात सध्या प्रत्येक युवा-युवती सर्वच मंत्री, आमदारांकडे नोकऱ्याच मागत आहे. सरकारी नोकर भरतीही मंदावली आहे आणि मोठ्या प्रमाणात बडे उद्योगही गोव्यात येत नाहीत. तथापि, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केलेल्या घोषणोमुळे युवा वर्गाच्या आशा थोड्या पल्लवित झाल्या आहेत. मात्र, काँग्रेसचे प्रवक्ते आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले की, गोमंतकीय युवक सरकारवर व भाजपवर प्रचंड नाराज आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीवेळी गोमंतकीय युवकांची मते मिळावीत म्हणून र्पीकर हे उगाच घोषणा करत आहेत. 2012 साली सरकार स्थापन केल्यानंतर पाच वर्षात पन्नास हजार रोजगार संधी निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, पण युवकांचा मोठा अपेक्षाभंग झाला. मुख्यमंत्री म्हणाले, की यावर्षी आम्ही स्थानिक युवकांना रोजगार देण्यासाठी नवी कृती योजना तयार केली आहे. जे उद्योग व व्यवसाय स्थानिकांना रोजगार संधी देण्याबाबत प्राधान्य देतील त्यांना आम्ही अनुदान व सवलती देणार आहोत. यामुळे पुढील एक किंवा दोन वर्षात गोव्यात बेरोजगार युवक म्हणून कुणी राहणार नाही. युवकांमध्ये उत्साह निर्माण करणारे गोवा सरकारचे रोजगारविषयक धोरण लवकरच जाहीर केले जाईल. येत्या दोन वर्षात गोवा राज्य बेरोजगारीपासून मुक्त होईल अशी आपल्याला आशा वाटते. दरम्यान, गोवा सरकारने नुकतेच आयटी धोरण जाहीर केले आहे. आयटी उद्योगांसाठी अनेक सवलती व अनुदान सरकारने आयटी धोरणातून जाहीर केले आहे. स्टार्ट अप धोरणही यापूर्वी जाहीर केले गेले. आयटी धोरणाद्वारे गोव्यात आयटी पार्क, इलेक्ट्रॉनिक सिटी वगैरे उभी करण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. गोव्याच्या आयटी क्षेत्रत यापुढील काळात आठ हजार रोजगार संधी निर्माण होतील असे आयटी मंत्री रोहन खंवटे यांचे म्हणणे आहे.