"गोव्यात स्थायिक व्हायला सर्वांना आवडते, परंतु राज्याची क्षमता आधी तपासा"
By किशोर कुबल | Published: July 2, 2024 02:49 PM2024-07-02T14:49:08+5:302024-07-02T14:49:24+5:30
- सुरेश प्रभू: पश्चिम घाटातील पर्यावरणाचेही संरक्षण करण्याचे आवाहन
किशोर कुबल/पणजी
पणजी : 'गोव्यात स्थायिक व्हायला सर्वांनाच आवडते. गोवा हे दिल्लीचे तर विस्तार केंद्रच बनले आहे. लोकसंख्या वाढत असल्याने गोव्याच्या क्षमतेचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. तसेच पश्चिम घाटातील पर्यावरणाचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात 'टेरी'च्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रभू म्हणाले की, 'गोवा हा शांत प्रदेश आहे येथील लोकांचे आदरातिथ्य अन्य प्रदेशांमध्ये लोकांना भावते. दिल्लीतील अनेकांनी येथे आपले 'सेकंड होम' केले आहे. निवृत्तीनंतर वरिष्ठ अधिकारीही गोव्यात स्थायिक व्हायला बघतात. इतर राज्यातील लोकांना गोव्यात स्थायिक होणे आवडते. परंतु येथील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या तुलनेत क्षमता तपासणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास व्हायला हवा.'
ते पुढे म्हणाले की, 'गोव्याच्या पश्चिम घाटात दुर्मिळ वनस्पती, प्राण्यांच्या जाती आहेत. पश्चिम घाटातील पर्यावरणाचे संवर्धन होणे काळाची गरज आहे.'
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पर्यावरणाबाबत सरकार गंभीर आहे. सांडपाणी प्रक्रिया न करणाऱ्या कारखान्यांवर सरकार कारवाई करणार आहे. कारखान्यांनी स्वतःचा प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) स्थापन करणे अनिवार्य आहे.