मनोहर पर्रीकरांची आठवण सर्वांनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 14:13 IST2024-12-15T14:13:56+5:302024-12-15T14:13:56+5:30
(स्व.) पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांचे अनेक आमदार, मंत्र्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. अनेकांना पर्रीकरांमुळेच मंत्रीपद लाभले. पर्रीकरांनी अनेक तरुणांना आमदार म्हणून तयार केले होते. पण पैकी काहीजणांनी नंतरच्या काळात त्यांचा आदर्श घेतला नाही. यापैकी प्रत्येकाला पर्रीकरांची आठवण सोयीनुसार होत राहते. हेही नसे थोडके.

मनोहर पर्रीकरांची आठवण सर्वांनाच
सद्गुरू पाटील संपादक, गोवा
मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीदिनी परवा सर्वांनीच त्यांची आठवण काढली. लक्ष्मीकांत पार्सेकरांपासून सुदिन ढवळीकरांपर्यंत आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापासून दामू नाईक व मायकल लोबोंपर्यंत सर्वांनीच पर्रीकरांच्या स्मृतीस वंदन केले. काही राजकीय नेते मिरामार येथील समाधीस्थळी गेले. तिथे त्यांनी पुष्पांजली वाहिली. पर्रीकर हयात असताना ज्या राजकारण्यांशी पर्रीकरांचा संघर्ष झाला होता, त्यांनी देखील पर्रीकर यांचे जयंतीदिनी गुणगान केले. त्यांनी आपणही पर्रीकरांना अभिवादन करत असल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले.
वास्तविक गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी मिरामारला जाऊन समाधीस्थळी थोडे बसायला हवे होते. सरदेसाई यांना पर्रीकर यांच्याच मंत्रिमंडळात प्रथम मंत्री होण्याची संधी मिळाली होती. विजय कधी काँग्रेसच्या सरकारचा भाग होऊ शकले नाहीत. ते भाजप सरकारचा भाग होऊन पर्रीकरांच्या अगदी विश्वासातले मंत्री बनले होते. टीसीपीसारखे वजनदार खाते सरदेसाईंना पर्रीकरांनीच दिले होते. नंतर पर्रीकर व विजय यांनी बाबूश मोन्सेरातना ग्रेटर पणजी पीडीए स्थापन करून दिली होती. त्यामुळे विजय, बाबूश किंवा रोहन खंवटे यांनी पर्रीकर यांना कधी विसरू नये. अर्थात ते विसरलेले नाहीत. मात्र विजयप्रमाणेच मंत्री रोहन खंवटे यांनीदेखील मिरामारला समाधीस्थळी भेट देण्याची गरज होती. पर्रीकर यांच्यामुळेच आपण भाजप सरकारमध्ये सहभागी झालो, असे २०१८ साली विजय व खंवटे यांनीही जाहीर केले होते. एका वर्षी हे सगळे नेते पर्रीकरांच्या समाधीस्थळी जमलेही होते. मात्र त्यांनी पर्रीकरांवरील आपले प्रेम व्यक्त करून दाखवण्यात सातत्य ठेवलेले नाही. विजय आता विरोधकांमध्ये आहेत आणि खंवटे तर भाजपचेच सदस्य आहेत, आमदार व मंत्रीही आहेत. बाबूश मोन्सेरात पणजीचे आमदार आहेत. पर्रीकरांच्या निधनानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने उत्पल पर्रीकरना पणजीत तिकीट दिले नाही. ते बाबूशला दिले गेले. पर्रीकरांच्या निधनानंतर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दिगंबर कामत यांना पक्षात परत घेतले. एखादा नेता हयात असतो तेव्हा पक्ष कसा वागतो व नंतर कसा वागतो हे कार्यकर्त्यांनाही कळावे, म्हणून ही उदाहरणे चांगली आहेत.
बाबूश मोन्सेरात व मनोहर पर्रीकरांचे नाते कायम लव्ह हेट पद्धतीचे राहिले. त्या दोघांची कधी मैत्री व्हायची तर कधी मोठे शत्रूत्व निर्माण व्हायचे. ताळगाव व पणजी हे दोन्ही मतदारसंघ शेजारी शेजारी असल्याने दोघांनाही राजकीयदृष्ट्या एकमेकांची गरज भासायची. त्या गरजेतूनच मग राजकीय तडजोडी व्हायच्या. पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात काम केलेले आणखी एक नेते म्हणजे म्हापशाचे स्वर्गीय फ्रान्सिस डिसोझा. म्हापशाचे बाबूश म्हणजे फ्रान्सिस डिसोझा. ते हयात असते तर निश्चितच त्यांनी पर्रीकरांविषयीच्या आपल्या अतिव मैत्रीच्या आठवणी सांगितल्या असत्या, पर्रीकर यांच्या निधनापूर्वीच फ्रान्सिस डिसोझा यांचे निधन झाले. पर्रीकर त्यावेळी अत्यंत आजारी होते, पण पर्रीकरांनी फ्रान्सिसचे अंत्यदर्शन घेतले होते. फ्रान्सिस व पर्रीकर हे दोघेही अमेरिकेतील इस्पितळात उपचार घेऊन आले होते.
फ्रान्सिस डिसोझा हे पहिल्यांदा म्हापशात जिंकल्यानंतर पर्रीकर यांच्याशी त्यांची दोस्ती वाढली. पर्रीकर यांच्यामुळेच ते भाजपमध्ये आले. अगोदर ते भाजपमध्ये नव्हते. पर्रीकर यांनी दोन राजकीय नेत्यांना कायम सांभाळले होते. एक फ्रान्सिस व दुसरे आताचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम व वाहतूक मंत्री म्हणून ढवळीकर यांनी काम केले होते. ढवळीकर यांच्या घरी दर गणेशोत्सवाला पर्रीकर न चुकता जायचेच.
ढवळीकर अनेकदा आम्हा पत्रकारांना सांगतात की- तुपासोबत पुरणपोळी कशी खायची असते ते पर्रीकर आपल्या घरी शिकले. अर्थात पर्रीकर यांना डायबेटीस होता पण तरी त्यांना पुरणपोळी आवडायची. ढवळीकर यांच्या वडिलांचाही पर्रीकर खूप आदर करायचे. त्यामुळेच तर २०१२ च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर दोन्ही ढवळीकर बंधूंना पर्रीकर मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. दोन्ही भावांना एकाच मंत्रिमंडळात मंत्री होण्याची संधी मिळण्याचा गोव्यातील तो पहिलाच प्रयोग होता. त्यापूर्वी व त्यानंतरही तसा प्रयोग गोव्यात कधी झाला नाही. म.गो. पक्ष आपल्यासोबत कायम राहिला तर भाजपही काही मतदारसंघांमध्ये सुरक्षित राहील असे २०१२ सालापासून पर्रीकरांना वाटत आले होते. पुढे लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मगोपशी मैत्री टीकवता आली नाही. त्यामुळे २०१७ साली युती होऊ शकली नाही. त्याचा परिणाम असा झाला की भाजपचे फक्त तेराच उमेदवार निवडून आले होते.
ढवळीकर यांच्याप्रमाणेच फ्रान्सिस डिसोझा हेही आपल्यासोबत राहिले तर आपण व भाजपही सुरक्षित राहील असे पर्रीकर यांना वाटण्याचे कारण असे की त्यावेळी फ्रान्सिस डिसोझा वगळता अन्य कोणी प्रबळ ख्रिस्ती नेता पर्रीकरांसोबत नव्हता. पर्रीकरांच्या विश्वासातील ख्रिस्ती नेता म्हणजे म्हापशाचे बाबूश अशी वस्तूस्थिती तयार झाली होती. (स्व.) माथानी साल्ढाणा वगैरे नंतर आले. विल्फ्रेड मिस्किताही भाजपमध्ये येऊन गेले, पण दोन-चार वर्षांनंतर पर्रीकरांचा मिस्कितांवरील विश्वास उडाला होता. आज फ्रान्सिस, माथानी किंवा मिस्किताही जिवंत नाहीत आणि पर्रीकरही हयात नाहीत. भाजपमध्ये आलेले मायकल लोबो, नीलेश काब्राल किंवा माविन गुदिन्हो भाजपचे आजचे खिस्ती चेहरे आहेत. यापैकी लोबो भाजपला अधूनमधून डोईजड होत असतात. पणजीचे बाबूश किंवा सांताक्रुझचे रुदोल्फ हे तसे नावापुरतेच भाजपमध्ये आहेत.
सुदिन ढवळीकर, रवी नाईक किंवा माविन असे मोजकेच नेते आहेत, ज्यांनी पर्रीकर मंत्रिमंडळातही काम केले व ते आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातही आहेत. रवी नाईक जरी पर्रीकरांसोबत काही वर्षे होते, तरी रवींची कधीच पर्रीकरांशी मैत्री झाली नाही. दोघांचे सूर तसे कधीच जुळले नाहीत. त्यामुळेच एके पहाटे रवींनी भाजपला गुडबाय केले होते. आपल्यामुळेच पर्रीकर सर्वप्रथम मुख्यमंत्री होऊ शकले असे रवी कधी कधी सांगतात, हा भाग वेगळा. रवींचा फोंड्यात २०१२ साली पराभव झाला त्याला भाजप-मगो युतीच कारणीभूत ठरली होती. पर्रीकरांची एक जोरदार सभा तेव्हा फोंड्यात झाली होती. दिगंबर कामत व पर्रीकर यांच्यात प्रारंभी खूप मैत्री होती, पण नंतर दोघांमध्ये मोठे शत्रूत्व निर्माण झाले. पर्रीकरांमुळेच कामत यांनी त्यावेळी भाजप सोडला होता असे मानले जाते. मात्र पर्रीकर चौथ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर कामत यांच्या वाट्याला खूप त्रास व अडचणी आल्याच. त्यामुळेच कामत यांना पुन्हा कधी पर्रीकरांविषयी प्रेम वाटले नाही. तसे वाटण्याचा प्रश्नही आला नाही.
लक्ष्मीकांत पार्सेकर यांची राजकीय कारकिर्द पर्रीकरांच्या साक्षीनेच घडली. पार्सेकर दोनवेळा भाजप प्रदेशाध्यक्ष झाले, ते ही पर्रीकरांमुळेच. पार्सेकरांना मुख्यमंत्रीपदही पर्रीकरांमुळेच मिळाले होते. परवा प्रथमच पार्सेकर खास हरमलहून मिरामारला आले. त्यांनी पर्रीकरांच्या स्मृतीस वंदन केले. पार्सेकर यांचा मांद्रेत पराभव झाल्यानंतरच्या काळात त्यांचे पर्रीकरांशी चांगले संबंध राहिले नव्हते. दयानंद सोपटेंना भाजपमध्ये फेरप्रवेश मिळाल्यानंतर तर पार्सेकरांनी विनय तेंडुलकर, पर्रीकर यांच्यावर रागच धरला होता. आता स्थिती वेगळी आहे. आता पर्रीकर नसल्याने पार्सेकर यांच्या मनात शत्रूत्व राहिलेले नाही. पार्सेकर यांच्यावर मध्यंतरी भाजप सोडण्याची वेळ आली. पार्सेकर आता पुन्हा भाजपमध्ये येण्याचीही शक्यता नाही. कारण भाजपमध्ये अगोदरच मराठा समाजातील नेत्यांची गर्दी झालेली आहे. त्या सर्व मराठा नेत्यांना पार्सेकर पुन्हा भाजपमध्ये आलेले नको आहेत. अशावेळी पार्सेकर यांनी पर्रीकर यांच्या स्मृतीला अभिवादन करून आपली वेगळी वाट चोखाळणे हे त्यांच्याही राजकीय हिताचेच आहे.
मुख्यमंत्री सावंत किवा अन्य अनेकांना पर्रीकर यांचे पूर्वी मार्गदर्शन मिळाले होते. भाजपची तिकिटे अनेकांना देऊन पर्रीकरांनी अनेक तरुणांना आमदार म्हणून तयार केले होते. त्यात प्रमोद सावंत यांच्यासह दिलीप परुळेकर, विनय, दामू नाईक, स्व. प्रभाकर गावकर, वासुदेव मेंग गावकर, सुभाष फळदेसाई आदी अनेकांचा समावेश आहे. काहीजणांनी नंतरच्या काळात पर्रीकरांचा आदर्श घेतला नाही, हा भाग वेगळा. मात्र प्रत्येकाला पर्रीकरांची आठवण सोयीनुसार होत राहते हेही नसे थोडके.
मायकल लोबो यांनी परवा सांगितले की- आपण पर्रीकरांशी भांडायचोदेखील. लोबो हेही पर्रा गावचे व पर्रीकरही त्याच गावचे. लोबो किंवा कार्ल्स आल्मेदा वगैरे ख्रिस्ती आमदारांनी एकेकाळी पर्रीकरांचा विश्वास प्राप्त केला होता. लोबो यांनी नंतरच्या काळात (पर्रीकरांच्या निधनानंतर) भाजप सोडण्याचा चुकीचा निर्णय घेतला, पण ते पुन्हा भाजपमध्ये आले.
मात्र लोबोचा संघर्ष संपलेला नाही. त्यांचे पाऊल चुकले. पर्रीकर असते तर लोबोही भाजपमध्ये टिकले असते. विजयही अजून मंत्रिपदी राहिले असते आणि मोन्सेरात यांच्यावर ताळगावचे आमदार म्हणूनच राहण्याची वेळ आली असती. पण नियतीला वेगळेच राजकारण अपेक्षित होते. त्या वेगळ्या राजकारणात घडत असलेली विविध कांडे, नोकरी घोटाळे वगैरे गोवा नाईलाजाने व असहाय्यपणे पाहत आहे.