स्वयंपूर्ण गोव्यासाठी सर्वांनी हातभार लावावा: मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2024 01:07 PM2024-09-01T13:07:13+5:302024-09-01T13:07:42+5:30
डिचोली सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक आमसभा उत्साहात
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: आपल्या गोव्याला प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी स्वयंमित्र कार्यरत असून सर्वांनी या स्वयंपूर्ण मित्रांना सहकार्य करून स्वयंपूर्ण गोव्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. दूरदृष्टी, लक्ष्य आणि नेटक्या नियोजनाद्वारे लक्ष्याचा पाठलाग ही यशाची त्रिसूत्री असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डिचोली सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक आमसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. येथील हिराबाई झांटये स्मृती सभागृहात रविवारी सकाळी संपन्न झालेल्या या सभेला व्यासपीठावर सन्माननीय अतिथी म्हणून थ्रिफ्ट सहकारी संघटना फोंडा गोवाचे अध्यक्ष पांडुरंग कुर्डीकर, हिशेब तपासणीस शिवानंद पळ, निवृत्त सभासद देवीदास डेगवेकर, उपाध्यक्ष दीपाली गावस, संचालक भिवा मळीक, शिवानंद नाईक गांवकर, सुनील नाईक, संगीता पर्येकर, विश्वास परब, संदीप देसाई, प्रदीप गावस, शीतल नाईक आदींची उपस्थिती होती.
संस्थेला चालू आर्थिक वर्षात ६९ लाख ८१ हजार रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला असून संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे अध्यक्ष पांडुरंग रामा गावस यांनी सांगितले. गेली ३३ वर्षे संस्थेला अ श्रेणी प्राप्त झाली असल्याचे सांगितले. दीप प्रज्वलन करून आमसभेला प्रारंभ करण्यात आला. दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात आला. तसेच सुमारे ४१ निवृत्त सभासदांचा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. पांडुरंग गावस यांनी सर्वांचे स्वागत केले. पांडुरंग कुर्डीकर शिवानंद पळ यांनी या सभेत मार्गदर्शन केले. शिवानंद नाईक गांवकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्राची प्रदीप भोसले यांनी आभार मानले.