समुद्र महाआरतीची संधी सर्वांना मिळावी; सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 08:01 AM2024-03-19T08:01:11+5:302024-03-19T08:02:31+5:30

'गोवा आध्यात्मिक महोत्सव' उत्साहात

everyone should have the opportunity to the ocean aarti assurance of full cooperation from the goa government | समुद्र महाआरतीची संधी सर्वांना मिळावी; सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही 

समुद्र महाआरतीची संधी सर्वांना मिळावी; सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सद्‌गुरूंच्या प्रेरणेतून आयोजित करण्यात आलेला हा गोवा आध्यात्मिक महोत्सव दरवर्षी आयोजित व्हावा. समस्त गोमंतकीयांना एकत्रितपणे समुद्र महाआरती करण्याची सुसंधी प्राप्त व्हावी. यासाठी गोवा शासनाद्वारे पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

सद्‌गुरू फाउंडेशन आणि श्री दत्त पद्मनाभ पीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला 'गोवा आध्यात्मिक महोत्सव' पणजी येथे मांडवी नदी किनारी परशुराम स्मारकजवळ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

गोव्यात योगसेतू, ज्ञानसेतू, कृषिसेतू व अटलसेतू असे चार सेतू निर्माण झाल्यानंतर संत-महंतांच्या पावन पदस्पर्शाने आज खऱ्या अर्थाने योगसेतूचे उ‌द्घाटन झाले आहे. सद्‌गुरू ब्रहोशानंदाचार्य स्वामीजींमुळे गोव्याची पुरातन संस्कृती विश्वभर पोहोचत आहे. गोव्यात अनेक महोत्सवांचे आयोजन होत असते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रकट कार्यक्रमारंभी समुद्रकिनारी तपोभूमी वेदविदुषी महिला पुरोहितांद्वारे विश्वशांती यज्ञ संपन्न झाला. प्रार्थना, गोव्यातील शंभरहून अधिक पखवाजवादक, हार्मोनियमवादक, गायक यांच्याद्वारे एकत्रितपणे सुंदर शास्त्रीय व वारकरी संगीताचे सादरीकरण करण्यात आले. सामूहिक पद्धतीने उपस्थित सर्व बाल, युवा, युवती, पुरुष, महिला या सर्वांनी श्रीमद्भगवद्‌गीतेतील १२ व्या अध्यायाचे पठण केले.

महोत्सवाचे विशेष म्हणजे गोव्याच्या इतिहासात प्रथमच समुद्र महाआरतीचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर १००० हून अधिक युवा युवती आपल्या देव, देश व धर्मासाठी, संस्कृती रक्षणार्थ संकल्पबद्ध झाले. तसेच सर्व संत-महंत, महनीय मान्यवरांना प्रमोटर ऑफ स्पिरिच्युलिटी पुरस्कार प्रदान करुन गौरवान्वित करण्यात आले.

व्यासपीठावर अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अविचलदेवाचार्य स्वामीजी, श्री रुमिणी पीठ, महाराष्ट्रचे पीठाधीश्वर जगद्‌गुरू रामानंदाचार्य स्वामी राजेश्वर माऊली सरकार, भगवान श्री लक्ष्मीनारायण धाम, दिल्लीचे प्रमुख महाब्रह्मर्षी महामंडलेश्वर कुमार स्वामीजी, अखिल भारतीय सनातन सत्पंथ संप्रदाय, महाराष्ट्रचे पीठाधीश्वर महामंडलेश्वर जनार्दन हरी स्वामीजी, कथाकार परम विदुषी गीता दीदीजी यांचे संतसान्निध्य लाभले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सद्‌गुरू फाउंडेशनच्या अध्यक्षा अॅड. ब्राह्मीदेवीजी यांच्यासह आंतरराष्ट्रीय स्तरावरून मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदमूर्ती ज्ञानेश्वर पाटील यांनी केले.गोवा आध्यात्मिकदृष्ट्या अनुभवण्याचा योग आज आला. अशा महोत्सवाच्या माध्यमातून आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे, असे कुमार स्वामी यावेळी म्हणाले.

गोमाता, योग, भगवान परशुराम, समुद्र नारायण ही गोव्याची खरी संस्कृती आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत ऐतिहासिक मंदिरांचे पुनर्निर्माण व्हावे व गोव्याचा खरा इतिहास लोकाभिमुख करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. अशाच प्रकारे शासनाने गोव्यातील विकृतींचा नाश करून पुरातन संस्कृती पुनरुज्जीवित करावी. आध्यात्मिक गोवा हे स्वप्न साकार होणारच हे नक्की, असे ब्रम्हेशानंदाचार्य स्वामी यावेळी म्हणाले.

आज गोवा आध्यात्मिक महोत्सवातून गोव्यातील संगीत कलेचे दर्शन घडले. खरोखरच या ऐतिहासिक आयोजनासाठी महोत्सवाच्या सद्‌गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचे कौतुक करतो. गोव्याची संस्कृती अनुभवताना अत्यानंद होत आहे. हा महोत्सव म्हणजे गोव्याची खरी ओळख होय, असे सद्‌गुरू अविचलदेवाचार्य म्हणाले.


 

Web Title: everyone should have the opportunity to the ocean aarti assurance of full cooperation from the goa government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.