स्पोर्टिंगने आय-लीगमध्ये पुनरागमन करावे अशी सर्वांची इच्छा: भारतीय फुटबॉलपटू आदिल खान
By समीर नाईक | Published: January 20, 2024 01:41 PM2024-01-20T13:41:58+5:302024-01-20T13:42:53+5:30
पणजीस्थित क्लबमध्ये युवा व्यवस्थेतील प्रतिभा विपुल प्रमाणात आहे
समीर नाईक/ पणजी: स्पोर्टिंग क्लब दी गोवा संघाने विजयी मानसिकता विकसित केली असून तृतीय विभागीय आय-लीग विजेता हा संघ रविवारी वास्कोतील टिळक मैदानावर सुदेवा दिल्ली एफसीविरुद्ध द्वितीय विभागातील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. पणजी स्थित क्लबमध्ये युवा व्यवस्थेतील प्रतिभा विपुल प्रमाणात आहे, तर कर्णधार मार्कुस मास्करेन्हस, जॉयनर लॉरेन्सो आणि आदिल खान यांचा अनुभव भविष्य घडविण्यास मदत करीत आहे.
द्वितीय विभागामध्ये आठ संघ सहभागी होणार असून डबल राऊंड रॉबिन पद्धतीने ‘होम अँड अवे’ तत्त्वावर ही स्पर्धा होणार आहे. अव्वल दोन संघांना २०२४-२५ च्या आय-लीगमध्ये बढती दिली जाईल आणि तळाला राहिलेल्या दोन संघांना २०२४-२५ आय-लीग तृतीय विभागात खेळावे लागेल. २०१६ मध्ये स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर स्पोर्टिंग पुन्हा आय-लीगमध्ये पुनरागमन करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे.
सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली आणि आम्ही तिसऱ्या विभागाचे विजेते होण्यासाठी शेवटच्या सामन्यापर्यंत एकजूट राखली आहेे. आमच्याकडे चांगले प्रशिक्षण पथक, व्यवस्थापन आहे. आम्ही आय-लीगसाठी पात्र व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे आणि आम्ही तयार आहोत, असे भारताचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आदिल खान याने सांगितले.
आय-लीगमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, आमच्याकडे दर्जेदार युवा खेळाडू आहे. एक सीनियर खेळाडू म्हणून मी त्यांना मदत करत आहे आणि माझा अनुभव सामायिक करत आहे. सुरुवातीला आमच्याकडे अनुभवाची कमतरता होती पण आता त्यांच्यापैकी बहुतेकांना हा अनुभव मिळाला आहे आणि त्यामुळे द्वितीय विभागामध्ये खेळणे तुलनेने सोपे जाईल असे आदिल खान याने पुढे सांगितले.
संघ अधिक खेळाडूंना करारबद्ध करत आहेत. संघ बांधणी करणे कठीण काम असते. आम्हाला आमच्या योजनेवर ठाम राहावे लागेल, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार कृती करावी लागेल आणि एकत्र काम करावे लागेल, असेही आदिलला वाटते. अर्मांडो कुलासो आणि त्याचा सहाय्यक क्लायमॅक्स लॉरेन्स यांच्या मार्गदर्शनाखाली स्पोर्टिंगने एक सामना शिल्लक असताना पदोन्नती मिळवली. एफसी बेंगळुरू युनायटेड, मुंबई केंकरे एफसी, स्पोर्टिंग क्लब बेंगळुरू, ऑरेंज एफसी आणि युनायटेड एससीसह गोव्याचा धेंपो एससी संघही या स्पर्धेत आहे.