गोव्यात सर्वाना मुक्त प्रवेश मिळणार; ताप असल्यासच चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 08:58 PM2020-06-08T20:58:02+5:302020-06-08T20:58:10+5:30
गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची कोविड चाचणी होणार नाही, तापासारखी लक्षणे दिसली तरच चाचणी
पणजी : राज्यात मोठ्या प्रमाणात लोकांचे येणो सुरू झाले आहे. रेल्वे, विमाने किंवा रस्तामार्गे जे लोक गोव्यात येतील, त्यांना यापुढे मुक्त प्रवेश मिळणार आहे. यापुढे नवी प्रक्रिया (एसओपी) लागू होणार आहे. त्यानुसार गोव्यात येणाऱ्या प्रत्येकाची कोविड चाचणी होणार नाही, तापासारखी लक्षणे दिसली तरच चाचणी केली जाणार आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी सकाळी सर्व मंत्र्यांची बैठक घेतली. मांगोरहीलच्या प्रकरणामुळे कोरोनाचे रुग्ण राज्यात वाढतात व दुसऱ्या बाजूने सगळे व्यवहारही सुरू होत असल्याने परराज्यातून बरेच प्रवासी गोव्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री व आमदारांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. कडक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा बहुतेक मंत्र्यांनी व्यक्त केली. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी वास्कोत पूर्ण लॉकडाऊन केले जावे असा मुद्दा मांडला. मात्र आरोग्य मंत्री विश्वजित राणे, विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी वेगळी भूमिका मांडली. एका विशिष्ट भागात कोरोना रुग्ण आढळले म्हणून पूर्ण शहरात लॉकडाऊन करण्याची गरज नाही. तसे झाल्यास लोक आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अडचणीत येतील, सगळे व्यवहार कायम बंद ठेवणे योग्य नव्हे असे लोबो व राणे म्हणाले.
नवीन एसओपी येणार
यापुढे राज्यात नवीन एसओपी लागू करण्याचे मंत्र्यांच्या बैठकीत तत्त्वत: ठरले आहे. गोव्यात रेल्वे, रस्तामार्गे किंवा विमानातून जे कुणी येतील, त्या सर्वाची सध्या चाचणी केली जाते पण यापुढे अशा प्रवाशांना फक्त थर्मल स्कॅनरमधून जावे लागेल. जर कुणाला ताप आहे असे आढळले तरच कोविद चाचणी केली जाईल. थर्मल गनने प्रत्येकाच्या शरीराचे तापमान तपासले जाणार नाही, असे मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. दरम्यान, आरोग्य सचिव श्रीमती निला मोहनन यांनी मात्र अजून याबाबत अधिकृत निर्णय झालेला नाही, विविध चर्चा सुरू आहे, असे स्पष्ट केले.