माजी मंत्री रमेश तवडकर यांची भाजपात घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 07:03 PM2019-02-25T19:03:40+5:302019-02-25T19:03:57+5:30
माजी क्रीडामंत्री आणि काणकोणचे माजी आमदार रमेश तवडकर यांनी सोमवारी पुन्हा भाजपात प्रवेश केला.
मडगाव - माजी क्रीडामंत्री आणि काणकोणचे माजी आमदार रमेश तवडकर यांनी सोमवारी पुन्हा भाजपात प्रवेश केला. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काणकोण मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढविलेल्या तवडकर यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घरवापसी झाली आहे.
राज्यसभा खासदार आणि भाजपाचे गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडूलकर यांनी मडगावात झालेल्या एका सोहळ्यात त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मीनाक्षी लेखी, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर, तसेच अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
2017 च्या निवडणुकीत पक्षाने काही चुकीचे निर्णय घेतल्यामुळेच आपल्याला बंडखोरी करावी लागली हे यावेळी तवडकरांनी मान्य केले. तवडकर हे गोव्यातील एसटी नेते असून विधानसभा निवडणुकीत भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारल्यावर हा समाज भाजपापासून दूर गेल्याने काणकोणसह किमान तीन ठिकाणी भाजपाला पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे गोव्यात हा पक्ष अल्पमतात आला होता.
यावेळीही तवडकर यांनी सुरुवातीला आपण दक्षिण गोव्यातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असे जाहीर करुन दक्षिण गोव्यातील एसटी बहुल भाग पिंजून काढला होता. या भागातून त्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकू लागली होती. त्याचमुळे नव्यानेच गोव्याचे महामंत्री म्हणून पक्षाचा ताबा घेतलेले सतीश धोंड यांच्यावर तवडकर यांचे मन वळविण्याची जबाबदारी दिली होती. धोंड यांच्या शिष्टाईमुळेच तवडकर पुन्हा भाजपात आले असून, ते भाजपाचे दक्षिण गोव्यातील लोकसभा उमेदवारही असू शकतात असे संकेत मिळाले आहेत.