अबकारी घोटाळा तिघांना भोवला; ७६ व्यावसायिकांची १६.८१ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 09:47 AM2023-06-28T09:47:12+5:302023-06-28T09:47:48+5:30

कारकूनसह दोन निरीक्षक निलंबित.

excise scam hits three 16 81 lakh fraud of 76 businessmen | अबकारी घोटाळा तिघांना भोवला; ७६ व्यावसायिकांची १६.८१ लाखांची फसवणूक

अबकारी घोटाळा तिघांना भोवला; ७६ व्यावसायिकांची १६.८१ लाखांची फसवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः मद्य परवान्याचे बोगस नूतनीकरण आणि बोगस चलन बनविल्याच्या प्रकरणात अबकारी खात्यातील कारकून हरीश नाईक याच्यासह दुर्गेश नाईक व विभूती शेट्ये या निरीक्षकांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

परवाने नूतनीकरणाद्वारे ७६ मद्य व्यावसायिकांची १६.८१ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करणे हरीश नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांना महागात पडले आहे. नूतनीकरणासाठी पैसे घेणे आणि ते खात्याच्या खात्यात न भरणे, अशी कृत्ये त्यानी केली होती. ज्या निरीक्षकाच्या स्वाक्षरीने चलने जारी करण्यात आली त्या निरीक्षकांनाही निलंबित करण्यात आले आहे.

मद्य व्यावसायिक नियमानुसार मद्यालयांच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यासाठी अबकारी कार्यालयात पैसे जमा करीत होते. हे पैसे कारकूनच हडप करतो याची भनकही त्यांना नव्हती. कारण त्यांना पैसे भरल्यावर चलन दिले जात होते. परंतु हे चलन बोगस होते हे त्यांना कळलेच नाही. त्यामुळे लोक पैसे भरत राहिले आणि कारकुनचे खिसे भरत गेले. एकूण ७६ मद्य व्यावसायिकांची त्यांनी अशा प्रकारे फसवणूक केली. या प्रकाराचा भांडाफोड झाला नसता तर ही फसवणूक आणि लुबाडणूक चालूच राहिली असती.

दुर्गेश नाईक सध्या तिसवाडीचे निरीक्षक, तर विभूती शेट्ये पेडणे कार्यालयातच निरीक्षक होत्या. हरीश नाईक याने हडप केलेल्या पैशांची वसुली खात्याकडून सुरु करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या प्रकरणाची दखल घेताना पूर्ण वसुली करून घेऊन कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

२७ लाख भरले

हा भ्रष्टाचार पचून जाईल, असे वाटल्यामुळे कारकून बिनधास्त होता. परंतु अनपेक्षिपणे या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यावर मात्र कारकुनाची बचावासाठी धावाधाव सुरु झाली. हडप केलेली रक्कम अबकारी खात्याच्या बँक खात्यात जमा करणे त्याने सुरू केले. त्याने हडप केलेली १६.८१ लाखांची रक्कम ३ वर्षांच्या व्याजासह २७.७८ लाख रुपये इतकी झाली आहे. त्याने ती रक्कम भरली असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली

निरीक्षक स्कॅनरवर

या प्रकरणाचा फटका हा दोन अबकारी निरीक्षकांनाही बसला आहे. कारकूनने बनविलेल्या बोगस चलनावर निरीक्षकांची स्वाक्षरी होती. त्यामुळे त्यांना जबाबदार धरून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. निरीक्षकांची स्वाक्षरी ही अजाणतेपणी केली होती की तेही कारस्थानात सहभागी होते हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. 

 

Web Title: excise scam hits three 16 81 lakh fraud of 76 businessmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.