इव्हेंटमध्ये बेकायदा मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात अबकारी खात्याची मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:28 PM2018-12-25T12:28:20+5:302018-12-25T12:29:08+5:30
तीन आठवड्यात १८ प्रकरणांमध्ये २५ हजार लिटर दारु जप्त
णजी : गोव्यात नाताळ, नववर्षानिमित्त ओल्या पार्ट्यांची धूम असून अनेक इव्हेंटही आयोजित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर अबकारी खात्याने नाड्या आवळताना इव्हेंटमध्ये बेकायदा मद्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. गेल्या तीन आठवड्यांच्या काळात १८ प्रकरणांमध्ये २५ हजार लिटर दारु जप्त करण्यात आली.
विनापरवाना मद्यविक्रीचा गुन्हा दंडनीय असून कठोर कारवाई केली जाईल, असे अबकारी खात्याचे सहआयुक्त सत्यवान भिवशेट यांनी सांगितले. सर्व इव्हेंट आयोजक, जे तिकिटे लावून कार्यक्रम करतात आणि तेथे मद्य विक्री करतात त्यांनी परवाने घेणे सक्तीचे आहे. १९६४ च्या गोवा अबकारी कर कायद्याखालील हे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
नाताळ, नववर्षात देश, विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात येत असतात. राज्यात दारु स्वस्तात मिळत असल्याने ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी खास करुन देशी पर्यटक गोव्यालाच जास्त पसंती देतात. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामीळनाडू, दिल्लीतून देशी पर्यटकांचा ओघ असतो. पुढील आठवडाभराच्या कालावधीत गोव्याच्या किनारी भागात लाखो पर्यटकांचा ओघ लागणार आहे. त्यामुळे रेस्टॉरण्टमालक, हॉटेलमालक तिकीटे लावून अशा इव्हेंटमध्ये दारु विक्री करतात. खात्याकडून योग्य ते परवाने न घेतल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.
भिवशेट म्हणाले की, अशा प्रकरणात मद्य जप्त केले जाते. शिवाय दंडही आकारला जातो.