हद्दपारी पास्टर डॉम्निकला हायकोर्टचा दिलासा नाही
By वासुदेव.पागी | Published: January 17, 2024 05:30 PM2024-01-17T17:30:27+5:302024-01-17T17:30:59+5:30
हद्दपारीचा आदेश जारी झाल्यावर ते न्यायालयात येवू शकतात असे न्यायालयाने त्यांना सुनावले आहे.
वासुदेव पागी, पणजी: जादूटोणा आणि बेकायदेशीर धर्मांतरण प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला ख्रिस्ती धर्मगुरू पेस्टर डॉम्निक आणि त्यांची पत्नी जोअन यांच्या विरुद्ध सुरू करण्यात आलेल्या हद्दपार प्रक्रियेत हस्तक्षेप यावेळी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नकार दिला. हद्दपारीचा आदेश जारी झाल्यावर ते न्यायालयात येवू शकतात असे न्यायालयाने त्यांना सुनावले आहे.
३१ डिसेंबर २०२३ रोजी रात्री डॉम्निक आणि जोअन यांना रात्री म्हापसा पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या विरुद जादू टोणा, फसवणूक आणि धर्मांतर केल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. या तक्रारीला अनुसरून म्हापसा पोलिसांनी डॉम्निकला अटक केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्याची जामीनवर मुक्तताही झाली होती.
डॉम्निकला जामीन मंजूर झाला असला तरी त्याला गोव्यातून हद्दपार करण्यासाठी म्हापसा पोलिसांनी प्रक्रिया सुरू केली होती. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना तसा प्रस्तावही पाठविला होता. या प्रकरणात प्रक्रियाही सुरू झाली आहे. दरम्यान आपल्या विरुद्ध सुरू असलेली हद्दपारीची कारवाई थांबविण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाला आणि पोलिसांना द्यावा अशी याचना करून डॉम्निक आणि त्याच्या पत्नीने खंडपीठात आव्हान याचिका सादर केली होती. मात्र डॉम्निक व त्याच्या पत्नीला कोणताही दिलासा खंडपीठाने दिला नाही. त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा आदेश जारी करण्यात आला तर ते पुन्हा न्यायालयात दाद मागू शकतात असे मात्र न्यायालयाने त्यांना आश्वासन दिले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आव्हान याचिका दोघांनीही मागे घेतली आहे.
आव्हान याचिका मागे घेण्यात आल्यामुळे आता त्यांच्या विरोधात सुरू असलेली हद्दपारीची कारवाई तडीला जाण्याच्या पूर्ण शक्यता निर्माण झाल्या आहेत.