नव्या रुग्णालयावर 216 कोटींचा खर्च अपेक्षित, शवागाराची पाहणी करू - विश्वजित राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 07:16 PM2019-07-26T19:16:58+5:302019-07-26T19:20:57+5:30
मडगाव येथील नव्या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या कामावर एकूण 216 कोटींचा खर्च येणार आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले आहे.
पणजी - मडगाव येथील नव्या दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीच्या कामावर एकूण 216 कोटींचा खर्च येणार आहे, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शुक्रवारी (26 जुलै) विधानसभेत सांगितले आहे. आम्ही त्या रुग्णालयाचे शवागार अगोदर सुरू करता येईल काय याचा अंदाज घेऊ, त्यासाठी प्रत्यक्ष पाहणीही करू, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस तसेच विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काही प्रश्न उपस्थित केले. सासष्टीतील व एकूणच दक्षिण गोव्यातील प्रेत आम्हाला मडगावच्या शवागारात ठेवताच येत नाहीत. ती अचानक पणजीला न्यावी लागतात व पुन्हा अंत्यसंस्कार करण्यासाठी मडगावला घेऊन यावी लागतात, अशी तक्रार आमदारांनी केली. नव्या रुग्णालयाचे पूर्ण काम होईल तेव्हा होईल पण अगोदर त्या रुग्णालयाचे शवागार तरी सुरू करा, अशी विनंती आमदार डायस यांनी केली. त्यावर निश्चितच आपण ती शक्यता पडताळून पाहीन, असे मंत्री राणे यांनी सांगितले. नव्यारुग्णालयाचे जुन्या रुग्णालयाचे स्थलांतर हे टप्प्याटप्प्याने केले जाईल. रुग्णालयावरील खर्च वाढला आहे.रुग्णालयातील इंटेरिअरच्या कामावरच तीस कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, असेही राणे यांनी सांगितले आहे.
तुम्ही मडगावच्या ईएसआय रुग्णालयाचे शवागार तथा तेथील पाच केबिनेट्स वापरात आणू अशी ग्वाही यापूर्वी विधानसभेत दिली होती, अशी आठवण कामत यांनी मंत्री राणे यांना करून दिली. त्यावर राणे यांनी आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून आम्ही ईएसआयचे केबिनेट्स प्रेतांसाठी प्राधान्याने वापरात आणू, असे स्पष्ट केले. मडगावच्या रुग्णालयात अगोदर अॅन्जीओग्राफी व अॅन्जीओप्लास्टीची सोय करा. कारण आता कुणाच्याही छातीत दुखू लागले की, प्रथमच अॅन्जीओग्राफी वगैरे केली जाते. छातीत दुखते म्हणजे ब्लॉक्स असतातच, असे कामत म्हणाले. या मागणीची आम्ही दखल घेतो पण सरकारने जो स्टेमी कार्यक्रम सुरू केला आहे, त्यामुळे कुणालाही हृदयविकाराचा झटका आला की, पंचवीस हजार रुपयांचे अगोदर मोफत इंजेक्शन करून रुग्णाला स्थिर केले जाते. मग त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेईपर्यंत पुरेसा वेळ मिळत असतो, असे राणे यांनी स्पष्ट केले आहे.