कर्करोग विभागासाठी तज्ज्ञ गोमेकॉतूनच मिळविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 08:49 PM2018-09-10T20:49:13+5:302018-09-10T20:49:26+5:30
नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) कर्करोग विभागासाठी लागणारे सर्व तज्ज्ञ डॉक्टर हे गोमेकॉतूनच घेण्यात येणार आहेत.
- वासुदेव पागी
पणजी - नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) कर्करोग विभागासाठी लागणारे सर्व तज्ज्ञ डॉक्टर हे गोमेकॉतूनच घेण्यात येणार आहेत. गोमेकॉतील कन्सल्टंट रेंकच्या डॉक्टरना रेसिडेंट म्हणून घेऊन प्रशिक्षण देऊन तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले जाणार आहे.
मुंबई येथील टाटा मेमोरियल कर्करोक इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टर अनुपमा बोरकर यांच्या नेतृत्वाखाली गोमेकॉत कर्करोग विभाग सुरू करण्यात आला आहे. रविवारी त्याचे औपचारीकरित्या उद्घाटनही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. गोमेकॉतील वॉर्डक्रमांक १४८ मध्ये सुरू करण्यात आलेला हा विभाग अद्याप तसा प्रत्यक्ष कार्यरत होवून रुग्णांना दाखल करून घेऊ लागला नसला तरी काम वेगाने सुरू आहे. सध्या सध्या या विभागासाठी बायो कॅबिनेट्स बसविण्याचे काम सुरू आहे. इतर बरीचशी कामेही व्हायची आहेत. परंतु कर्करोग विभागासाठी लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तज्ज्ञ डॉक्ट मंडळी आहे. तज्ज्ञ डॉक्टर हे गोमेकॉतीलच नियुक्त केले जाणार आहेत. गोमेकॉतील अनेक विभागात काम करणाºया डॉक्टरना या विभागात आपले करियर करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी कन्सल्टंट रेंकच्या डॉक्टरना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण विभाग प्रमुख डॉ अनुपमा बोरकरच देतील. गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिवानंद बोरकर यांनी ही माहिती दिली.
गोमेकॉतील सर्व कन्सल्टंटना हा विषय सांगण्यात आलेला आहे. तसेच अनेकांनी कर्करोगात काम करण्याची इच्छाही व्यक्त केलेली आहे. येत्या काही दिवसात गोमेकॉत या संबंधात अनेक बदल घडताना दिसून येणार आहेत. या सुपरस्पेशलिटी विभागाचे प्रमुख म्हणून जसे टाटा मेमोरियलमधील डॉ अनुपमा बोरकर यांना गोमेकॉच्या सेवेत आणले गेले तसे इतर प्रत्येक तज्ज्ञांना बाहेरून घेणे अश्यक असल्यामुळे गोमेकॉतूनच हा विभाग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वीही न्युरोसर्जरी व युरोसर्जरी सारखे जे सुपरस्पेशलीटी विभाग सुरू करण्यात आले तेही अशाच पद्धतीने सुरू करण्यात आले होते.