कोकण रेल्वेकडून नेपाळला रेल्वे डब्यांची निर्यात; शिरपेचात खोवला मानाचा तुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 08:31 PM2019-10-15T20:31:41+5:302019-10-15T20:32:04+5:30

आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या कोकण रेल्वे महामंडळाच्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार

Export of railway coaches to Nepal from Konkan Railway | कोकण रेल्वेकडून नेपाळला रेल्वे डब्यांची निर्यात; शिरपेचात खोवला मानाचा तुरा

कोकण रेल्वेकडून नेपाळला रेल्वे डब्यांची निर्यात; शिरपेचात खोवला मानाचा तुरा

Next

मडगाव: आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या कोकण रेल्वे महामंडळाच्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार असून, कोकण रेल्वेकडून लवकरच नेपाळसाठी रेल्वे डब्याची निर्यात केली जाणार आहे. येत्या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात कोंकण रेल्वे दोन डेम्यू रॅक्स नेपाळला निर्यात करणार असून, कोकण रेल्वेची ही पहिलीच निर्यात ठरणार आहे.

कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी मंगळवारी मडगावात झालेल्या महामंडळाच्या 29व्या स्थापना दिनी बोलताना ही माहिती दिली. यापूर्वी कोकण रेल्वेला बिहारमध्ये रक्सूल व नेपाळमध्ये काठमांडू येथे प्रस्तावित रेल्वेमार्गाचे अभियांत्रिकी सर्व्हेक्षण करण्याचे काम मिळाले होते. त्यानंतर 10 मे 2019 रोजी कोकण रेल्वेने नेपाळ रेल्वेशी कोच निर्यातीच्या समझोता करारही केल्याची माहिती त्यांनी दिली.

या स्थापना दिन कार्यक्रमात कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तसेच जम्मू काश्मीर विभागाच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचा-यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यावसायिक विभागाचे संचालक एच. डी. गुजराती, कार्मिक विभागाचे संचालक सुभाषचंद्र गुप्ता, मुख्य पर्सनल अधिकारी के. के. ठाकूर व क्षेत्रीय रेल्वे व्यवस्थापक बी. बी. निकम हे उपस्थित होते.
गोव्याबद्दल माहिती देताना गुप्ता म्हणाले, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधीतून मडगाव, करमळी व थिवी या तीन रेल्वे स्थानकांचा 25 कोटी रुपये खर्चून कायापालट करण्यात येणार आहे. आतापर्यंत गोव्यात वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर खासदार निधी योजनेखाली 11.80 कोटी रुपयांच्या सुविधा दिल्या गेल्या आहेत. आतापर्यंत गोवा व महाराष्ट्रातील सर्व स्थानकांवर वायफाय सेवा उपलब्ध असून लवकरच आता कर्नाटकातील स्थानकेही वायफाय सेवेने जोडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दहा नवी रेल्वे स्थानके
सध्या कोकण रेल्वेतर्फे दहा नवी रेल्वे स्थानके उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, पाच अतिरिक्त लुप लाईन्स सुरू केल्या जाणार आहेत. या नव्या रेल्वे स्थानकामध्ये इंदापूर, गोरेगाव रोड, सापेवामने, कलबनी, कडवाई, विरावली, खारेपाटण, अचिर्णे, मिरझन व इन्नाजे यांचा  तर लुप लाईनसमध्ये अंजणी, सावर्डा, राजापूर रोड, वैभववाडी रोड व मुर्डेश्वर स्टेशनचा समावेश असेल. रोहा ते वीर हा 46 किमी अंतराचा रेलमार्गाचे मार्च 2020 पर्यंत दुपदरीकरण केले जाणार असून, मार्च 2021 पर्यंत संपूर्ण कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे.

Web Title: Export of railway coaches to Nepal from Konkan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.