ड्रग्स विक्रेते पोहोचले शाळेच्या दारात, गोवा विधानसभेत चिंता व्यक्त
By admin | Published: August 9, 2016 07:32 PM2016-08-09T19:32:52+5:302016-08-09T19:32:52+5:30
गोव्यात शाळेपासून जवळच अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची खळबळजनक माहिती वास्कोचे भाजप आमदार कार्लुस वाझ यांनी विधानसभेत दिली.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 09 - गोव्यात शाळेपासून जवळच अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची खळबळजनक माहिती वास्कोचे भाजप आमदार कार्लुस वाझ यांनी विधानसभेत दिली. या प्रकरणात शाळेच्या बाहेर एका ड्रग्स विक्रेत्याला अटक करण्यात आल्याची कबुलीही पोलीसांनी दिली आहे.
अंमली पदार्थांची विक्री आता शाळेच्या दारांत पोहोचली असल्यामुळे गोवा विधानसभेत चिंता व्यक्त केली. वास्को भागात शाळांना लागूनच अंमली पदार्थांच्या विक्रेत्यांचा वावर असतो असे कार्लुस आल्मेदा यांनी सांगितले. पोलीस त्यांच्यावर का कारवाई करीत नाहीत याचे स्पष्टीकरणही त्यांनी मागितले. या प्रश्नाला उत्तर देतांना जुलै महिन्यात दोन दिवसांच्या कालावधीत ४ जणांना लाखो रुपयांच्या अमली पदार्थांसह पकडले असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. २५ जुलै या दिवशी राजू हनुंमत्ता बुलर, फरहान, राझिया मुझावर आणि २७ जुलै या दिवशी सुभाष साहू यांना अमली पदार्थांसह वास्को येथे अटक करण्यात आली आहे. सुभाष साहू याला एका शाळेच्या बाहेर पकडण्यात आले होते असे त्यांनी सांगितले. अंमली पदार्थाची समस्या केवळ वास्कोची नसून ती संपूर्ण गोव्याची असल्याचे ते म्हणाले.
वर्ष २०१२ ते जून २०१६ या कालावधित पोलिसांनी वास्को भागात अमली पदार्थ विरोधी कारवाई केलेली नसल्याची लेखी माहिती गृहखात्याकडून मिळालेल्या उत्तरात यावेळी देण्यात आली. त्याचा उल्लेख करून आल्मेदा यांनी पोलीस आणि अंमली पदार्थ व्यवहारवाले यांचे साटेलोटे असण्याची शक्यताही व्यक्त केली.