आनंदाची बातमी! दूधसागर पर्यटनाला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2024 07:57 AM2024-06-03T07:57:51+5:302024-06-03T07:58:46+5:30
आमदार गणेश गावकर यांच्या प्रयत्नांना आले यश
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : दूधसागर पर्यटनाला वाढीव मुदत मिळाल्याने दूधसागरवर जाणाऱ्या जीप मालकांना दिलासा मिळाला आहे. पाऊस आणि वन्यजीवांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कुळे येथील दूधसागर धबधब्यावर १ जूनपासून पर्यटकांच्या वाहतुकीस बंद करण्याचा आदेश वन्यजीव आणि पर्यावरण पर्यटन विभागाने जारी केला होता. आमदार डॉ. गणेश गावकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून दूधसागर पर्यटन हंगाम वाढविण्यासाठी प्रयत्न केले होते.
दूधसांगर टूर ऑपरेटर असोसिएशनच्या समितीने आमदार गावकर यांची भेट घेऊन हा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार गावकर यांनी टूर ऑपरेटर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह वन खात्याचे पीसीसीएफ यांची भेट घेऊन तसेच मुख्यमंत्री सावंत यांच्यांशी चर्चा करून हा आदेश स्थगित ठेवला आहे. यामुळे दूधसागर धबधबा पर्यटन व्यवसाय पुढील आदेश येईपर्यंत सुरू राहणार आहे. याबद्दल जीप मालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कुळे पंचायतीचे सरपंच गोविंद शिगावकर यांनी सांगितले, की आमदार गावकर हे सुरुवातीपासूनच जीप चालकांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. २०१२ च्या अगोदर येथे फार कमी जीप गाड्यांना परवानगी होती. पर्यटकांची संख्या लक्षात घेता, त्यांनी पुढाकार घेऊन जीपगाड्या वाढवून दिल्या. बिड्डिफातर येथे रॅम्प घालून जीप मालकांना दिलासा दिला. कुळे येथे नदीवर रॅम्प घालण्याचे काम पूर्ण केले. वाहतुकीचा दरही वाढवून दिला. सध्या दूधसागर धबधब्याजवळ पर्यटन विकास महामंडळातर्फे पर्यटकांसाठी साधन सुविधा उपलब्ध करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे, अशी माहिती शिगावकर यांनी दिली.