बँकेची माणसे असल्याचे सांगून पाच लाखाचा गंडा!
By वासुदेव.पागी | Published: December 21, 2023 04:09 PM2023-12-21T16:09:20+5:302023-12-21T16:09:38+5:30
तक्रारदाराच्या बँक खात्याच्या सुरक्षेविषयी तसेच केवायसी विषयी माहिती देऊन त्याच्याकडून वन टाइम पासवर्ड मिळवला गेला होता.
पणजी: फोनवरून कॉल येतो आणि फोन करणारा माणूस स्वतःला अमुक अमुक बँकेचा अधिकारी असल्याचे सांगतो. खातेदाराची केवायसी व इतर काही कारणे सांगून त्याच्याकडून गोपनीय माहिती घेतो आणि त्याच्या बँक खात्यातील पैसेच हडप करतो, हे प्रकार गोव्यात तरी अजून थांबलेले नाहीत. याच पद्धतीने दोन भामट्यानी पणजी येथील एकास पाच लाखांचा गंडा घातला.
तक्रारदाराचे नाव रमेश शेट्टये असे असून त्याने सायबर विभागात तक्रार नोंदविली आहे. त्याने नोंदविलेल्या तक्रारीनुसार दोघा व्यक्तीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून त्याला फोन केला. स्वतःला त्यांनी बँकेचे अमुक अमुक अधिकारी असल्याचे सांगितले. तक्रारदाराच्या बँक खात्याच्या सुरक्षेविषयी तसेच केवायसी विषयी माहिती देऊन त्याच्याकडून वन टाइम पासवर्ड (ओ टी पी) मिळविला. तसेच त्याच्या खात्यातील पाच लाख रुपये रक्कम आपल्या खात्यात ट्रान्सफर केली. आपण पुरता फसलो गेलो याची कल्पना आल्यावर त्याने पोलिसात धाव घेतली. जुने गोवे येथील सायबर पोलीस विभागात यांनी तक्रार नोंदवली असून आपली फसवणूक करून आपल्या खात्यातील पैसे हडप करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान अलीकडच्या काळात गोव्यात पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारांनी कारवाया सुरू केले आहेत. हे सायबर गुन्हेगार विशेष करून महिलांना लक्ष करतात. तसेच वयोवृद्धांनाही लक्ष करतात. अशा माणसापासून सावध रहावे अशी मार्गदर्शिका काही महिन्यापूर्वी गोवा सायबर पोलीस विभागाने जारी केली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदविला आहे. संजय त्याचे नाव ओम कुमार मिश्रा असे आहे. पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.